घोटी-भंडारदरा मार्गासाठी ९८ कोटींचा निधी मंजूर; खासदार गोडसेंच्या पाठपुराव्याला यश 

इगतपुरी शहर (नाशिक) : नाशिक-नगर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या घोटी-भंडारदरा राज्य मार्गाच्या दुरुस्तीसह नूतनीकरणासाठी निधी मिळावा, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. घोटी (पिंपळगाव मोर) ते भंडरदरा या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने ९८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. 

जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास

घोटी-भंडारदरा या राज्य मार्गालगत एसएमबीटी रुग्णालय असून, भंडारदरा, रतनगड, कळसूबाईचे शिखर ही पर्यटनस्थळे आहेत. नगर जिल्ह्यातील अकोले आणि नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे दोन आदिवासी तालुके या रस्त्यामुळे एकमेकांना जोडले गेले आहेत. काही वर्षांपासून घोटी-भंडारदरा या राज्यमार्ग क्रमांक २३ ची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागत आहेत. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांसह प्रवासी, वाहनधारक, पर्यटक तसेच रुग्णांच्या नातेवाइकांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी तक्रारी केल्या होत्या. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा, यासाठी खासदार गोडसे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. जानेवारी २०२१ अखेर रस्त्याच्या नूतनीकरणाची निविदाप्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

या मार्गाच्या नूतनीकरणामुळे नाशिक आणि नगर या दोन्ही जिल्ह्यांतील दळणवळण सोयीचे होणार असून, विकासाला चालना मिळणार आहे. रुग्णांची, प्रवाशांची तसेच पर्यटकांची होणारी गैरसोय व कुचंबणा यामुळे दूर होणार आहे. येत्या वर्षभरात संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल. 
- हेमंत गोडसे, खासदार 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..