चंदनपुरी यात्रोत्सवास प्रशासनाकडून परवानगी नाही; कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे संकट उभे 

मालेगाव (जि.नाशिक) : कोरोनामुळे श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवास परवानगी नाकारल्याची माहिती प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली. इतिहासात प्रथमच यात्रोत्सव होणार नाही. दर वर्षी पौष पौर्णिमेला चंदनपुरीत १५ ते २० दिवस मोठा यात्रोत्सव होतो. या वर्षी २८ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरवात होणार होती. 

कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे संकट उभे ठाकले
श्री खंडेरायाच्या यात्रोत्सवास पहिल्याच दिवशी दीड ते दोन लाख मल्हारभक्त हजेरी लावतात. याशिवाय १५ दिवस भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. यात्रेत लहान-मोठी पाचशेपेक्षा अधिक दुकाने लावली जातात. राज्यात कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे संकट उभे ठाकले आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या वर्षी चंदनपुरी यात्रोत्सवास परवानगी नाकारण्यात आल्याचे शर्मा यांनी कळविले आहे. राज्यात शासनाने लॉकडाउनचा कालावधी ३१ जानेवारीपर्यंत वाढविला आहे. यात्रा, उरुस व इतर धार्मिक उत्सावांमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र होऊ शकतो अशा कार्यक्रमांना शासनाने परवानगी दिलेली नाही. यासंदर्भात चंदनपुरी ग्रामपंचायत व स्थानिक पोलिस प्रशासनाला माहिती कळविण्यात आली आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

धार्मिक कार्यक्रम होणार 
यात्रोत्सव रद्द झाला असला तरी पौष पौर्णिमेला होणारे विविध धार्मिक कार्यक्रम मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. पौष पौर्णिमेला काठी व देवाच्या मुखवट्यांची मिरवणूक काढली जाते. देवाची आरती, तळी भरणे, कोटम भरणे आदींसह मंदिरातील धार्मिक कार्यक्रम होतील. यात्रोत्सव रद्द झाल्याने याचा फटका शेकडो व्यावसायिकांना बसणार आहे.  

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा