चंदनपुरी यात्रोत्सव रद्द झाल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प! ग्रामीण अर्थकारणावरही परिणाम 

मालेगाव (जि. नाशिक) : उत्तर महाराष्ट्रात सारंगखेडा येथील दत्त जयंतीनिमित्त होणारा चेतक महोत्सव व या यात्रोत्सवापाठोपाठ खंडोबा महाराजांचा चंदनपुरी येथील यात्रोत्सव सर्वांत मोठा मानला जातो. मात्र कोरोनाच्या संकटामुळे यंदा यात्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

या यात्रेला कसमादेसह उत्तर महाराष्ट्रातील भाविक हजेरी लावतात. यात्रेत लहान-मोठी सुमारे अडीचशेहून अधिक दुकाने थाटतात. अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. ग्रामपंचायतीला सुमारे तीन लाखांचे व देवस्थान ट्रस्टलाही मोठे उत्पन्न मिळते. पौष पौर्णिमेपासून सुरू होणारा यंदाचा यात्रोत्सव कोरोनामुळे रद्द झाल्याने कोट्यवधीच्या उलाढालीला मुकावे लागले आहे. जानेवारीअखेर व फेब्रुवारीच्या सुरवातीचा असे सलग दोन रविवार एकादशी आल्याने दिवट्या-बुधल्या, जागरण गोंधळ या कार्यक्रमांनाही आळा बसला. 

ग्रामीण अर्थकारणावर परिणाम

कसमादेतील चंदनपुरी, देवमामलेदार व नामपूर येथील यात्रोत्सव प्रसिद्ध आहे. या यात्रांमुळे ग्रामीण भागातील लहान-मोठ्या व्यावसायिकांना मोठा आधार मिळतो. यात्रेतील उलाढाल व उत्पन्न यात त्यांना मोठी संधी असते. त्यासाठी किमान तीन महिने अगोदर नियोजन सुरू असते. यात्राकाळात खाद्यपदार्थ, खेळणी, भांडी, मसाला, शोभेच्या वस्तू, सौंदर्यप्रसाधने, प्रसाद, श्रीफळ, हळद-कुंकू, भंडारा यातून मोठी उलाढाल होते. हॉटेल व्यावसायिकांना ही पर्वणी असते. किमान पन्नास मोठी हॉटेल्स चंदनपुरी यात्रोत्सवात थाटली जातात. जागामालक व परिसरातील शेतकऱ्यांना भाड्यापोटी लाखोंची रक्कम मिळते. यात्रेत किमान दोन प्रसिद्ध तमाशे येतात. लघुव्यावसायिकांना यात्रोत्सव व्यवसायासाठी बळ देतो. पर्यायाने होलसेल व ठोक विक्रेत्यांचीही विक्री वाढते. याशिवाय विविध राज्यांतील मौत का कुवा, जादूगर, पाळणे आदीही येथे दाखल होतात. यात्रोत्सव काळात प्रत्येक व्यावसायिकाला तीन आठवड्यांच्या कालावधीत सरासरी दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळते. व्यावसायिकांच्याच सुमारे ५० ते ६० लाखांच्या उत्पन्नावर गदा आली. येथे कोटम भरणे, नवस फेडणे यांसह विविध कार्यक्रम होतात. या काळात चिकन-मटणाची विक्रमी विक्री होते. या सर्व उलाढालीला लगाम लागल्याने ग्रामीण अर्थकारणावरही त्याचा काहीअंशी परिणाम झाला आहे. 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

यात्रोत्सवाचा रंग फिका 

यात्रोत्सवात तळी भरणे, कोटम भरणे, देव भेटविणे, काठ्या मिरविणे, नवस फेडणे यांसह विविध धार्मिक कार्यक्रम होतात. वाघ्या मुरळींना या माध्यमातून मोठा रोजगार व उत्पन्न मिळते. यात्रोत्सव रद्द झाला असला तरी, धार्मिक कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. यामुळे वाघ्या मुरळी, गोंधळींना उत्पन्न मिळत असले तरी खाद्यपदार्थ, खेळणी, पाळणे, तमाशा व मनोरंजनाची साधने नसल्याने यात्रोत्सवाची रंगत जाणवत नाही. २४ जानेवारी व ७ फेब्रुवारी असे सलग दोन रविवार एकादशी आल्याने अनेकांना मांसाहारी नैवेद्य दाखवत कोटम भरता आला नाही. त्यामुळे १४ फेब्रुवारीला चंदनपुरीत गर्दीचा महापूर होता. पौष पौर्णिमेला यात्रोत्सवाच्या दिवशी व रविवारमुळे यात्रोत्सवासारखीच गर्दी, वाहतूक कोंडी झाली होती.  

हेही वाचा - "माझी चिमुरडी उपाशी असेल हो.." चिमुकलीचा लागेना थांगपत्ता; मातेचा आक्रोश