चंद्रकांत पाटलांना झटका ; शिवसेना जिल्हा प्रमुखपदी दीपकसिंग राजपूत यांची निवड

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सामील झालेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेनं मोठा धक्का दिला आहे. बंडखोरांच्या गटात सहभागी झाल्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख पद त्यांच्याकडून काढून घेत, त्यांच्या जागी माजी जि.प. सदस्य दीपकसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यात मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांचाही समावेश आहे. बंडखोर आमदारांसोबत जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील शिंदे गटात दाखल झाले आहेत. गेल्या महिन्यात जिल्ह्यात आलेले संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी बंडखोरांवर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार पक्षात मोठे फेरबदल केले जात असून, नव्याने पदाधिकारी नियुक्त केल जात आहे. आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे शिवसेना जिल्हा प्रमुखपदाची धुरा आता माजी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत यांच्याकडे देण्यात आली आहे.

राजपूत यांच्याकडे जामनेर, मुक्ताईनगर आणि रावेर या तीन तालुक्यांची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. जिल्ह्यात झालेल्या या फेरबदलामुळे आ. चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का मानला जात असून जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांच्या गटात खळबळ उडाली आहे. येत्या काळात अनेकांची उचलबांगडी केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का ? 

The post चंद्रकांत पाटलांना झटका ; शिवसेना जिल्हा प्रमुखपदी दीपकसिंग राजपूत यांची निवड appeared first on पुढारी.