चंपाषष्ठीमुळे भरताची वांगी, कांद्याच्या पातीला सोन्याचा भाव; खंडेरायाचं दर्शनही घरूनच!

पंचवटी (जि.नाशिक) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री खंडेराव महाराज यात्रा अर्थात चंपाषष्ठीला यंदा कोरोनाचा फटका बसला आहे. प्रादुर्भाव नको म्हणून प्रशासनाने भाविकांच्या देवदर्शनास मज्जाव केल्याने रविवारी (ता. २०) गंगाघाटावरील यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. देवाला प्रिय असलेला नैवेद्य अर्थात भरतासाठी लागणारी वांगी व कांद्याची पात यांचे दर आजच गगनाला भिडला आहे. 

घरूनच घ्या खंडोबारायाचे दर्शन!
चंपाषष्ठीचे औचित्य साधत दरवर्षी गंगाघाटावरील खंडेराव महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. यंदा कोरोनामुळे प्रशासनाने देवस्थानला यात्रा स्थगित करण्यास सांगितल्याने कित्येक वर्षात देवदर्शन व येथील यात्रोत्सवावर गदा आली आहे. त्यामुळे यावर्षी गंगाघाटावर गर्दी न करता घरूनच देवदर्शन घेण्याचा सल्ला मंदिराच्या मुख्य पुजार्यांनी दिला आहे. यात्रोत्सवामुळे येथे होणारी हजारो रुपयांची उलाढालही ठप्प होणार आहे. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

भरताची वांगी @ ५० रुपये 
अवकाळी पावसाने यंदा भरताच्या वांग्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात किलोभर वांग्यासाठी पन्नास ते साठ रुपये मोजावे लागत आहेत. भरतासाठी लागणारी कांदापात, लसूनपातही ६० रुपयांपर्यंत पोचली. भरीत करण्यासाठी लागणारे दर्जेदार वांगी जळगाव परिसरातून नाशिकमध्ये येतात. यंदा आवकही घटल्याने भाववाढ झाल्याचे विक्रेते सांगतात. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने मंदिर बंद ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे भाविकांनी गंगाघाटावर गर्दी न करता घरूनच देवदर्शन घेऊन सहकार्य करावे. - सोमनाथ बेळे, मुख्य पुजारी, श्री खंडेराव महाराज देवस्थान