चर्चा लॉकडाउनची, शेतकरी चिंताग्रस्त! संकटातून उभारी घेत असतानाच पोटात गोळा

चांदोरी (जि.नाशिक) : गेल्या वर्षी एप्रिलपासून लागू झालेल्या लॉकडाउनमुळे तीन-चार महिन्यांत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले. या अभूतपूर्व संकटातून शेतकरी उभारी घेत असतानाच आता पुन्हा लॉकडाउनच्या जोरदार चर्चेने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

लॉकडाउनच्या जोरदार चर्चेने चिंतेचे वातावरण
गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आल्याने बाजारपेठा बंद होत्या. परिणामी, शेतातील उभ्या पिकांची विक्री झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातच पिके सोडून द्यावी लागल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पिके घेण्यासाठी केलेला खर्च पूर्णपणे वाया गेला. बहुतांश शेतकरी कर्जबाजारी झाले. लॉकडाउनने कधी नव्हे एवढा शेतकरी आर्थिक संकटात सापडला. तसेच शेतमजुरांसोमर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. शेतकरी यातून स्वतःला सावरत असतानाच अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. त्यातूनही उभारी घेत शेतकऱ्यांनी फळबागा, भाजीपाला पिके घेतली. समाधानकारक पाऊस व पोषक हवामानामुळे सध्या पिके जोमदार आली असून, ती विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. वर्षभरात नागरिकांमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासंदर्भात मोठी जनजागृती झाली. कोरोनासोबत जगण्यास जनता शिकली आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाउनचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

मोठा आर्थिक फटका

शेतीचा मुख्य जोडधंदा असलेल्या दुग्धव्यवसायालाही याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. दूध विक्री ठप्प झाल्याने त्याचा आर्थिक तोटा दुग्धव्यावसायिकांना सहन करावा लागला. या आर्थिक संकटातून अनेक दूध उत्पादक शेतकरी अद्याप सावरलेले नाहीत. - सुधाकर भोज, दुग्धव्यावसायिक 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने लॉकडाउनच्या चर्चेने पुन्हा जोर धरल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. शासनाने अनुचित निर्णय घेऊ नये, जो शेतकऱ्यांसाठी त्रासदायक असेल. 
- मधुकर टर्ले, शेतकरी, चांदोरी 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO