‘चला, जाणूया नदीला’ अभियानाची धुळ्यात भात नदीपासून सुरुवात

धुळे,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या लहरीपणामुळे पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. यामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणामी होतो आहे. तसेच प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भुपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. नद्यांमध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहनक्षमता व साठवण क्षमता कमी झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांच्या अभ्यास करुन त्यांची सोडवणूक करण्यासाठी स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने चला जाणूया नदीला या अभियानाची सुरवात करण्यात आली आहे.

या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातून ७० नद्यांची निवड करण्यात आली असून यांत धुळे जिल्ह्यातून एकमेव भात नदीची निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच भात नदी समन्वयक भिला सोनू पाटील व उमेश पांडूरंग पाटील (राजाराम फाऊंडेशन, कापडणे) यांच्या उपस्थितीत जि.प.सदस्य राम भदाणे यांच्या सक्रीय सहभागाने भात नदीच्या उगमास्थान वडेलपासून नदी यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी वडेल, तिसगांव, ढंढाणे, नगांव व कापडणे येथील जेष्ठ ग्रामस्थ, शेतकरी, तरुण उपस्थित होते.

याप्रसंगी भात नदी समन्वयक भिला सोनू पाटील व उमेश पांडूरंग पाटील यांनी चला जाणूया नदीला या अभियानाचे उद्दीष्ट, नदी संवाद अभियान व नदी साक्षर करण्याबाबत उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन करुन ही योजना यशस्वी करण्याचे अावाहन केले. यावेळी नगांव ग्रुप ग्रामपंचायत सरपंच ज्ञानज्योती मनोहर भदाणे यांनी नदी साक्षर अभियान यात्रेचे स्वागत केले असून या यात्रेची जनजागृती करुन व्यापक करण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत नगांव अंतर्गत येणाऱ्या वडेल, तिसगांव, ढंढाणे गावातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग नोंदूवून चला जाणूया नदीला अभियानाला यशस्वी करण्याचा प्रयत्न राहिल असे यावेळी म्हटले.

या नदी यात्रेत वडेल, तिसगांव, ढंढाणे, नगांव येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तरुण मित्र व शेतकऱ्यांनी आपला सक्रीय सहभाग नोंदवून मागील काळातील नदीचा माहित असलेला इतिहास समन्वयकांसमोर विषद केला. ही यात्रा राजाराम फाऊंडेशन, सुदर्शन चौक, कापडणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शासन प्रशासन ग्रामपंचायत या सर्वांच्या सहभागातून पुढेही सुरु राहणार आहे.

हेही वाचा :

The post 'चला, जाणूया नदीला' अभियानाची धुळ्यात भात नदीपासून सुरुवात appeared first on पुढारी.