चांदवडच्या श्री रेणुकामातेचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घेतले दर्शन

चांदवड; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्हयात पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती उदभवली आहे. यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे. पर्यायाने पिण्याच्या पाण्याचे संकट जिल्ह्यावर आहे. या सर्व परिस्थितीत नवरात्रोत्सव काळात जोरदार पाऊस पडू दे अन जिल्ह्यावर अन शेतकऱ्यांवर ओढवलेले दुष्काळाचे सावट नाहीसे होऊ दे अशी साद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी चांदवडच्या श्री रेणुका मातेला घातली आहे.

चांदवड निवासीनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी श्री रेणुका मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवार (दि.१८) रोजी भेट देत देवीचे दर्शन घेतले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांचे मंदिराचे व्यवस्थापक सुभाष पवार यांच्या हस्ते शालश्रीफळ व श्री रेणुका मातेची प्रतिमा देत स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी श्री रेणुका मातेच्या यात्रोत्सावाची माहिती घेतली. यावेळी चांदवडचे उपविभागीय प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार यांनी चांदवड व देवळा तालुक्यातील दुष्काळाची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिली. चांदवड शहराचे वैभव असलेल्या रंगमहालाचे कामकाज गेल्या काही वर्षापासून रखडल्याने धूळ खात पडला आहे. हे रखडलेले कामकाज लवकरात लवकर सुरु होऊन रंगमहाल पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी व्यवस्थापक सुभाष पवार यांनी जिल्हाधिकारी शर्मा यांच्याकडे केली. यावेळी चांदवडचे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, सिओ रमाकांत डाके, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, मंदिराचे व्यवस्थापक सुभाष पवार, मनोज शिंदे, बिटू भोयटे, गणेश पारवे आदीसह नागरिक उपस्थित होते.

The post चांदवडच्या श्री रेणुकामातेचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घेतले दर्शन appeared first on पुढारी.