चांदोरीत शॉर्टसर्किटमुळे सात एकर ऊस खाक! शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

चांदोरी (जि. नाशिक) : येथे शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सुमारे सात एकर ऊस खाक झाला. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वीजवाहक तारांमध्ये घर्षण होऊन त्याची ठिणगी पडून आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

चांदोरी येथील गट क्र. ६४८ सतीश गायखे, माणिक गायखे, संजय गायखे या शेतकऱ्यांचे उसाचे क्षेत्र आहे. शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी सातच्या सुमारास वीजवाहक तारांमध्ये घर्षण होऊन उसाच्या शेतात ठिणग्या पडल्या. त्यामुळे उसाने पेट घेतला. शिवाय वाऱ्याचे प्रमाणही जास्त असल्याने आग पसरली गेली. शेतकरी व नागरिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केल्याने शेजारच्या शेतातील ऊस वाचला. मात्र, गायखे यांच्या उसाचे मोठे नुकसान झाले. चांदोरी येथील अनेक भागात विजेच्या तारा कमी उंचीवर आहेत. त्यामुळे त्या थेट उसाला चिकटतात व घर्षण होऊन ठिणग्या तयार होऊन आगीच्या घटना घडतात. अनेक दिवसांपासून याबाबत मागणी करूनही महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

मदतीपासून शेतकरी वंचित... 

गेल्या वर्षी मेमध्ये चांदोरी शिवारात सुमारे दहा एकर ऊस व द्राक्षबाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. यासंदर्भात पंचनामे झाले. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आठ महिने उलटूनही मदत मिळालेली नाही. 

महावितरण विभागाने चांदोरी शिवारातील जमिनीच्या दिशेने आलेल्या तारांचा तसेच रोहित्राचे प्रश्‍न मार्गी लावावेत, अन्यथा इतर ठिकाणीही अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. 
- अनिल भोर, सामाजिक कार्यकर्ते, चांदोरी 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

वीजतारांमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने दोन खांबामधील अंतर जिथे जास्त असेल तिथे मध्ये खांब टाकण्याचे काम सुरू केले आहे. खांब सरळ करून ताण देणे व लघुदाब वाहिन्यांवर एलटी स्पेसर टाकण्याचे काम सुरू आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरण विभाग प्रयत्नशील आहे. 
- विशाल मोरे, सहाय्यक अभियंता, चांदोरी उपकेंद्र