जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो) च्या चांद्रयान-३ मोहिमेत जळगाव जिल्ह्यातील हातेड (ता. चोपडा) येथील संजय गुलाबचंद देसर्डा यांनी द्रवरूप इंधननिर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
चोपडा येथील वर्धमान जैन श्री संघाचे संघपती गुलाबचंद इंदरचंद देसर्डा यांचे सुपुत्र संजय देसर्डा हे गेल्या २० वर्षांपासून इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. चंद्रयान-३ साठी त्यांनी द्रवरूप इंधनावर काम केले. पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि नुकतेच प्रक्षेपित झालेले यान एलव्हीएम ३ मध्ये द्रवरूप इंधन लागते. यात इस्रोकडून वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून जैन यांना जबाबदारी देण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी मंगळयान, चंद्रयान – २, चंद्रयान -३ सह याव्यतिरिक्त अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.
सरकारी शाळेत शिक्षण
संजय देसर्डा यांचा जन्म चोपडा तालुक्यातील हातेड येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण हातेडच्या सरकारी शाळेत झाले. नंतर फैजपूर येथील जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. गेट परीक्षेत उत्तीर्ण होऊन आयआयटी वाराणसीत म्हणजेच बनारस हिंदू विद्यापीठातून एम. टेक. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. २००३ मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी आलेल्या इस्रोच्या समितीने संजय देसर्डा यांची निवड केली. त्यानंतर संजय देसर्डा यांच्याकडे इस्रोकडून विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या. त्या त्यांनी यशस्वी पार पाडल्या आहेत. जैन फार्म फ्रेश फूड्सच्या करार शेतीचे प्रमुख गौतम देसर्डा, प्लास्टिक पार्क येथील कस्टम विभागाचे वरिष्ठ अधिकारी डोंगरमल देसर्डा आणि जैन फूड पार्क येथे कार्यरत छगनमल देसर्डा यांचे ते पुतणे आहेत. या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व कंपनीतर्फे संजय देसर्डा यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
- सोलापूर : पाणी साठवण क्षमता वाढणार; 19 गावांचा समावेश
- नोकरदारांसाठी ‘आयटीआर-1 सहज’ का गरजेचा?
- मटण, मासळी, चिकनवर पुणेकरांचा ताव
The post चांद्रयान मोहिमेला जळगावच्या सुपुत्राचे इंधनरूपी बळ appeared first on पुढारी.