निफाड (जि.नाशिक) : चाकूचा धाक दाखवून ट्रकसह ७४ लाख रुपये किमतीचे विदेशी मद्य ट्रकसह चोरून नेणाऱ्या चौघा संशयितांना पोलिसांनी विंचूर येथे सापळा रचून अटक केली. या वेळी पोलिसांनी चौघा संशयितांकडून सुमारे ८२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
विंचूरला ७४ लाखांच्या मद्य चोरीप्रकरणी चौघांना अटक
९ डिसेंबर २०२० ला मध्यरात्री नाशिक ते औरंगाबाद महामार्गावर विकास दाजिबा शेंडगे (पांगरी खुर्द, ता. मंठा, जि. जालना) त्यांच्याकडील ट्रक (एमएच १८, एए ८६०७)ने मुद्देमाल घेऊन नांदेड येथे जात असताना निफाड तालुक्यातील शिवरे फाटा परिसरात सहा ते सात संशयितांनी चारचाकीमध्ये येऊन त्यांना अडविले. या वेळी सर्व संशयितांनी श्री. शेंडगे यांना चाकू दाखवून मारहाण करत त्यांच्या ताब्यातील ट्रक आणि ट्रकमधील परवाना असलेले विदेशी मद्याचे ९५० बॉक्स असा एकूण ७४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला.
पोलिसांना पेट्रोलिंग व नाकाबंदी करण्याचे आदेश
या प्रकरणी निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत पोलिसांना पेट्रोलिंग व नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी विंचूर एमआयडीसी परिसरात एक आइस फॅक्टरीजवळ सापळा रचून संशयित सचिन वाघचौरे (वय ३८, रा. दत्त चौक, विजयनगर, अंबड), इरफान याकूब मोमीन (३३, रा. जमदाडे चौक, मनमाड), शरीफ अब्दुल शेख (२३, रा. जमदाडे चौक, मनमाड), अरबाज नजीर काझी (२४, रा. जुना ईदगाह, मनमाड) यांना ट्रकसह ताब्यात घेतले. या वेळी या संशयितांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारांसह गुन्हा केल्याचे कबूल केले.
हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO
पथकाची कामगिरी
पोलिस अधीक्षक सचिन पाटील व अपर पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण शर्मिष्ठा वालावलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे निफाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे प्रभारींसह पोलिस निरीक्षक आशिष आडसूळ, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, निकम, निचळ, गिते, खरात, पगार, राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न