चाकोरीबाहेरील शेती पडली महागात! पपई शेतीला निसर्गाचा तडाखा; शेतकरी चिंतेत

नाशिक/निफाड : पारंपरिक पिकापासून म्हणावा तसा लाभ होत नसल्याने शेतकऱ्यांना चाकोरीबाहेरची पिके घेण्याचे आवाहन शासन आणि कृषीतज्ज्ञांकडून नेहमी केले जात असते. अशाच विचाराने निफाड येथील प्रयोगशील शेतकरी दीपक श्रीवास्तव यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात पपईची लागवड केली आहे. मात्र या शेतीलाही निसर्गाचा तडाखा बसल्याने शेतकरी चिंतेत आहे. 

तीन लाख रुपये खर्च

श्रीवास्तव म्हणाले, की गहू, मका, सोयाबीन या पारंपरिक पिकांच्या शेतीतून म्हणावे तसे उत्पन्न हाती येत नव्हते. त्यामुळे दोन एकरवर पपईची लागवड करण्याचा निर्णय घेतला. ‘तायवान- ७८६’ या जातीच्या एक हजार ८०० झाडांची लागवड केली, त्यासाठी जमिनीची उत्तम मशागत करून ठिबक संच बसवले. मल्चिंग पेपरने संपूर्ण आधुनिक पद्धतीने पपई लागवडीचे नियोजन केले. रोपे, मजुरी, खते, मल्चिंग पेपर, वाहतूक अशा सर्व गोष्टी मिळून आजपर्यंत तीन लाख रुपये खर्च केला. हवामान, उत्पादन, किंमत अशा सर्व गोष्टी अनुकूल ठरल्या, तर साधारणपणे दहा लाख रुपये उत्पन्न मिळेल, असा हिशेब होता. परंतु निसर्गाने जबरदस्त तडाखा दिल्याने झालेला खर्चदेखील भरून निघेल की नाही, अशी शक्यता आहे.

हेही वाचा>> नात्याला काळिमा फासणारी घटना! अल्पवयीन मुलीवर बापाकडून अत्याचार; मुलाला जन्म दिल्याने प्रकार उघडकीस

सोन्यासारखा माल मातीमोल

एप्रिल व मेचा भाजून काढणारा उन्हाळा आणि पूर्ण पावसाळाभर अतिवृष्टी व ढगाळ हवामान यामुळे पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने आणि अतिपाण्यामुळे झाडांची म्हणावी तशी वाढ झाली नाही. खराब हवामानामुळे व्हायरस आणि बुरशीजन्य रोगांचाही प्रादुर्भाव झाला. त्यामुळे फळांची संख्या कमी पडली आहे. त्यातच ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणजे किरकोळ बाजारात पपईला चांगली मागणी व भाव असूनही घाऊक व्यापारी मात्र शेतकऱ्यांच्या पदरात भाव पडू देत नाही. त्यामुळे सोन्यासारखा माल मातीमोल द्यायची वेळ आली आहे. 

हेही वाचा>> खोदकाम करतांना सापडली सोन्याची घागर? बघायला गाव झाले गोळा; प्रत्यक्षात मात्र वेगळाच प्रकार

खर्च करून पपईतून चांगले उत्पन्न मिळाले नाही. ठिबक सिंचनासाठी तब्बल एक लाख २० हजारांचा खर्च करून आता आठ महिने होत आले; परंतु अद्याप शासकीय अनुदानाचा एक रुपयादेखील हाती आलेला नाही.  दीपक श्रीवास्तव, शेतकरी