चाळिशीपुढील नागरिकांनो काळजी घ्या! गेल्‍या आठवडाभरातील नाशिकमधील कोरोनाची स्‍थिती

नाशिक : गेल्‍या वर्षी जिल्ह्यात कोरोना रुग्‍ण आढळण्याचे प्रमाण उच्चांकावर होते. त् ‍यावेळी वयाच्‍या साठ वर्षांपुढील बाधितांची संख्या लक्षणीय आढळली होती. नोव्‍हेंबर २०२० पासून रुग्‍णसंख्या घटण्यास सुरवात झाली होती. डिसेंबर व जानेवारीतही नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित होती; परंतु फेब्रुवारीच्‍या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. यात चाळिशीपुढील रुग्‍णांची संख्या सर्वाधिक आहे.

जिल्ह्यातील ५६ टक्के बाधित चाळिशीपुढील 

गेल्‍या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. आठ दिवसांत दोन हजार ७२३ बाधित आढळले. यांपैकी एक हजार ५२२ रुग्ण ४० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले असून, हे प्रमाण ५५.८९ टक्‍के आहे, तसेच २६ ते ४० वयोगटातील ७७२ बाधित आढळले असून, बारा वर्षांखालील ९९ चिमुकल्‍यांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. 

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा

बाधितांमध्ये सव्वीस वर्षापुढील रुग्‍णांची संख्या लक्षणीय   
गेल्‍या २० ते २७ फेब्रुवारीच्‍या आकडेवारीनुसार जिल्ह्यात दोन हजार ७२३ बाधित आढळले असून, यात एक हजार ६१५ पुरुष, तर एक हजार १०८ महिला रुग्‍ण आहेत. चाळिशीपुढील बाधितांचे प्रमाण ५६ टक्‍के, तर १२ वर्षांखालील वयोगटात आढळलेल्‍या ९९ पॉझिटिव्‍हमध्ये ५७ मुले व ४२ मुलींचा समावेश आहे. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

सोळा मृतांपैकी एक महिला 
आठवडाभरात जिल्ह्यात एकूण १६ बाधितांचा मृत्‍यू झाला. यांपैकी तब्‍बल १५ पुरुष रुग्‍ण असून, एका महिला रुग्‍णाचा समावेश आहे. ४१ ते ६० वर्षे वयोगटात पाच पुरुष व एका महिला रुग्‍णाचा मृत्‍यू झाला. साठ वर्षांपुढील वयोगटात नऊ पुरुष बाधितांचा मृत्‍यू झालेला आहे, तर २६ ते ४० वयोगटात एका पुरुष बाधिताचा बळी गेला आहे. 

वयोगटनिहाय आढळलेले कोरोनाबाधित 
(कालावधी २० ते २७ फेब्रुवारी) 
वयोगट आढळलेले पॉझिटिव्‍ह 

०-१२ ९९ 
१३-२५ ३३० 
२६-४० ७७२ 
४१-६० १०२३ 
६१ वर्षांपुढील ४९९