चिंताजनक! मालेगावात कोरोनाचा घट्ट विळखा; शहरातील रुग्णालये हाऊसफुल

मालेगाव (जि. नाशिक) : राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना येथील  शहर व तालुक्याला कोरोनाने पुन्हा घट्ट विळखा घातला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून शहरातील खासगी व शासकीय रुग्णालये हाऊसफुल झाले आहेत.

प्रशासन बेफिकीर..रुग्णांचे हाल..

शहरातील ॲक्टीव रुग्णांची संख्या सतराशेपेक्षा अधिक असून ग्रामीण भागात सातशेवर रुग्ण बाधीत आहेत. गेल्या चार दिवसापासून येथे रोज किमान दोन ते चार कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. गृहविलगीकरणातील रुग्ण घरात न थांबता बिनधास्तपणे बाहेर फिरत असल्यानेच रुग्णसंख्या वाढत आहे. कोणत्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण आहेत हे देखील समजून येत नाही. नागरिकांची बेफिकिरी वृत्ती व प्रशासनाला पुरेसे गांभीर्य नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात व्हॅन्टीलेटर उपलब्ध नसल्याने रुग्णांना नाशिककडे धाव घ्यावी लागत आहे.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

कार्यक्रमांना अजुनही मोठ्या प्रमाणावर गर्दी

कोरोनाने दुसऱ्या टप्प्यात शहर व ग्रामीण भागात हातपाय पसरविले आहेत. येथे पंधरा दिवसातच दोन हजारावर रुग्ण आढळले. बहुतांशी रुग्णांना गृहविलगीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. यातील जवळपास निम्मे रुग्ण व्यवस्थित उपचार घेऊन घरी थांबून आहेत. यातील काही जण बिनधास्तपणे फिरत असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ग्रामीण भागात तर शहरापेक्षाही भयानक परिस्थिती आहे. मास्क, सॅनिटायझरचा तुरळक नागरीक वापर करतात. ग्रामीण भागात लग्नसोहळे, अंत्ययात्रा, दशक्रिया विधी आदी कार्यक्रमांना अजुनही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गर्दीला अटकाव घालण्याचे कुठलेही नियोजन प्रशासनाकडे नाही. परिणामी तालुक्यातील मोठी गावे कोराेनाच्या विळख्यात अडकली आहेत. 
शहरातील कोविड सेंटर व खासगी रुग्णालय हाऊसफुल झाली आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने येथे नवीन रुग्णांसाठी व्हॅन्टिलेटर उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना नाशिकला हलविण्याची वेळ अनेक कुटुंबियांवर येत आहे. रुग्णसंख्या वाढत असताना अजुनही 25 टक्के नागरीक मास्क वापरत नाहीत. 

हेही वाचा > कोरोनात मधुमेहींसाठी 'म्युकोरमायकोसिस' रोग ठरतोय 'यमराज'!...

पुर्वीचीच पध्दत अवलंबवावी

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आरोग्य विभागाचे कर्मचारी संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन घरातील उर्वरित सदस्यांना तपासणी करण्याचा आग्रह करत होते. यामुळे रुग्ण व कुटुंबातील इतर सदस्य बाहेर हिंडतांना दिसत नव्हते. गृहविलगीकरणाच्या पध्दतीमुळे गावात कोणते रुग्ण पॉझिटिव्ह आहेत याची माहिती ग्रामपंचायतीला देखील नसते. शहरात देखील हीच परिस्थिती आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांच्या हातावर क्वॉरंटाईनचे शिक्के मारावेत. तसेच त्यांच्या घराजवळ प्रतिबंध क्षेत्र असल्याचा फलक लावावा अशी मागणी हाेत आहे.