चिकन, अंड्याचे दर वाढले; कोरोनाकाळात प्रथिनयुक्त पदार्थांच्या मागणीत प्रचंड वाढ

नामपूर (जि.नाशिक) : गेल्या वर्षी बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे चिकनच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांना लाखो रुपयांची आर्थिक झळ बसली होती. परंतु, यंदा कोरोनाकाळात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी चिकन व अंडी खाण्याचा सल्ला दिल्याने मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.

मागणी व पुरवठ्याचे प्रमाण

अंडी व चिकनच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याने नागरिकांना चिकन सुमारे २४० रुपये प्रतिकिलो, तर बॉयलर अंडी ७५ ते ८० रुपये डझन दराने विकत घ्यावी लागत आहेत. बागलाण तालुक्यात काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी चिकन तसेच अंडी सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. चिकन, अंडी यांच्या मागणी व पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त झाल्याने दर वाढले आहेत. बर्ड फ्लूच्या संकटात अनेक कुक्कुटपालन व्यावसायिकांनी पक्ष्यांचे पालन केले नाही. त्यानंतर कोरोनाच्या सुरवातीच्या काळात चिकन, अंडी यांच्या सेवनाबाबत सोशल मीडियावर गैरसमज पसरल्याने कुकुटपालन व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य पोल्ट्री असोसिएशनने चिकन महोत्सवासारखे उपक्रम राबवून खवय्यांमध्ये जनजागृती केली.

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

सध्या बाजारात जिवंत कोंबड्यांचा तुटवडा

टाळेबंदीची भीती तसेच कोंबड्यांच्या तुटवड्यामुळे पंधरवड्यापासून चिकनच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी करोनाचा संसर्ग वाढीस लागल्याने एप्रिल-मेमध्ये चिकनच्या दरात मोठी वाढ झाली होती. उन्हाळ्यात कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम होतो. पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने ग्रामीण भागातील कुक्कुटपालन केंद्रे बंद ठेवण्यात येतात. त्यामुळे सध्या बाजारात जिवंत कोंबड्यांचा तुटवडा जाणवत आहे. उन्हाळ्यात जिवंत कोंबड्यांचे (पक्ष्यांचे) वजन वाढत नाही. या कालावधीत पक्षी मोठ्या प्रमाणावर पाणी पितात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. कोंबड्यांचे खाद्य महाग झाले आहे. पक्ष्यांचे संगोपन करण्याचा खर्च वाढल्याने चिकनच्या दरात वाढ होत असल्याचे कुक्कुटपालन व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

यंदा कोरोनामुळे दरात वाढ
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अंडे उपयुक्त असल्याने सध्या त्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. उन्हाळ्यात अंड्यांची मागणी कमी होऊन भावात घसरण होत असते. मात्र, यंदा कोरोनामुळे दरात वाढ झाली आहे. उन्हाळ्यात इंग्लिश अंड्यांचा प्रतिनग दर सुमारे चार ते साडेचार रुपये असतो; मात्र सध्या तो सहा ते सात रुपयांपर्यंत पोचला आहे. तसेच गावराण अंड्यांचा प्रतिनग दर सुमारे पाच ते सहा रुपये असतो; तो आता आठ ते दहा रुपयांपर्यंत झाला आहे. गेल्यावर्षी पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. या वेळी कडक उन्हाळ्यात अंडी, चिकनच्या मागणीत वाढ झाल्याने भाव तेजीत आले आहेत. 

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शरीराला विपुल प्रमाणात प्रथिनांची आवश्यकता असते. प्रथिनांमुळे शरीरातील लाल पेशी वाढायला मदत होते. तसेच, आजारातून लवकर बरे होता येते. डाळी, कडधान्ये, दूध, दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन आदी पदार्थांतून प्रथिने मिळतात. चिकन, अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात. त्यामुळे कोरोनाकाळात चिकन, अंड्यांचे सेवन करावे. 
- डॉ. शाहबाज शेख, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, नामपूर 

पंधरा-वीस दिवसांपासून अंड्यांची मागणी प्रचंड वाढल्याने भाव वधारले आहेत. यापूर्वी एका आठवड्यात दहा हजार अंडी विकली जात होती. कोरोनाचा प्रसार वाढल्याने नागरिकांनी आहारावर भर दिला आहे. त्यामुळे तीन दिवसांत १२ हजार अंडी विकली जात आहेत. 
- मुकेश बाविस्कर, संचालक, एमबी प्रॉव्हिजन, नामपूर