चिचोंडी औद्योगिक वसाहतीस प्रतीक्षा प्रकल्पांची; वीजपुरवठ्यासह आस्थापनांचीही कमतरता 

चिचोंडी (नाशिक) : येवला तालुक्यात कृषिपूरक उद्योग आणि पैठणी उद्योग अतिशय महत्त्वाचे आहेत. यात प्रामुख्याने मका, कांदा यावरील आधारित पूरक उद्योग येथे उभारल्यास येथील औद्योगिक वसाहत लवकर नावारूपास येईल. चिचोंडी (ता. येवला) येथे उभारत असलेली औद्योगिक वसाहत ही अशा उद्योगांना भरारी देण्याचे काम करेल. स्थानिकांना रोजगार प्राप्त होईल. मात्र दहा वर्षे उलटूनदेखील येथील भूसंपादन व अलीकडेच झालेले मजबूत चकाचक रस्ते व तारकंपाउंड, पाण्याच्या टाकीचे काम वगळता मुख्य असलेल्या वीजपुरवठ्यासह आस्थापना, प्रकल्पांसह सर्व प्रश्न अनुत्तरित असल्याने येथील प्रतीक्षेतील एमआयडीसी प्रत्यक्षात कधी अवतरणार, असा प्रश्न पडू लागला आहे. 

मृगजळ तर ठरणार नाही ना?

येवला तालुक्यातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या महत्त्वाकांक्षी वचननाम्यातील महत्त्वाचा विषय असलेली चिचोंडी येथील औद्योगिक वसाहत जमीन निश्चितीच्या दहा वर्षांनंतरही अद्यापही प्रगतीत नसून येथे एकही प्रकल्प न आल्याने बेरोजगार युवकांचा हिरमोड झाला आहे. तालुक्यात व आपल्या शिवारात सहज रोजगार उपलब्ध होईल म्हणून सोन्यासारख्या जमिनी येथील स्थानिकांनी औद्योगिक वसाहतीसाठी दिल्या. मात्र दहा ते बारा वर्षे उलटून पण रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या नसल्याने येथील औद्योगिक वसाहत मृगजळ तर ठरणार नाही ना, असा प्रश्न पडत आहे. 

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

नोकऱ्या, कामधंदे, उद्योग नक्की कधी

चिचोंडी येथे २००८ मध्ये येथील जमीन निश्चित झाल्यानंतर सुरवातीला विरोध झाला. मात्र २०१३ मध्ये शेतकऱ्यांच्या सहमतीने येथे जमिनीचे संपादन झाले. येथील ४५ हेक्टर शासकीय जमीन व शेजारील ६५ हेक्टर खासगी अशी एकूण ११० हेक्टरवर रस्ते व प्लॉट पडले आहेत. जवळपास तीनशे एकरांवर प्लॉट पडले असून, अंतर्गत रस्ते, पाइपलाइन तसेच पाणी उपलब्धतेसाठी विंचूरहून थेट पाइपलाइन टाकली आहे. १६ कोटींची पाइपलाइन, टाकी, तर अंतर्गत रस्ते व पाइपलाइनसाठी सात कोटींचा निधी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मिळवून दिला आहे. येथील औद्योगिक वसाहतीमुळे रोजगार उपलब्ध होऊन बेरोजगारीचा प्रश्न दूर होईल या आशेने परिसरातील २० ते २५ शेतकऱ्यांनी आपल्या बागायती तसेच जिरायती जमिनी त्या वेळी हवा असलेला योग्य मोबदला घेऊन दिल्या. मात्र भविष्याचे गावाने पाहिलेले स्वप्न, मुलाबाळांना नोकऱ्या, कामधंदे, उद्योग नक्की कधी साकारणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे.

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले

एकूण संपादित क्षेत्र 

शासकीय - ४५ हेक्टर 
खासगी - ६५ हेक्टर 
एकूण - ११० हेक्टर 

- एकूण ३५० एकरांवर प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट 
- एमआयडीसीमुळे दोन हजार बेरोजगारांना काम उपलब्ध होईल 
- जमीन दिलेले शेतकरी - २२