चित्रकला परीक्षेचा ब्रेक दहावीला महागात! गुण मिळण्यासाठी परीक्षा घेण्याची मागणी

येवला (नाशिक) : शासकीय चित्रकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या विद्यार्थी जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा आहेत. कला क्षेत्रामध्ये करिअरसाठी या परीक्षा म्हणजे महत्त्वाची पहिली पायरी असते. या परीक्षेतून मिळणाऱ्या गुणांमुळे विद्यार्थ्यांची दहावीची टक्केवारी वाढते. या संकट कालावधीत या परीक्षांची विद्यार्थ्यांसाठी गरज वाढलेली असून, शासनाने या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्याची मागणी होत आहे. 

शासकीय कला परीक्षांचे नियोजन गरजेचे

दर वर्षी राज्यात व राज्याबाहेर लाखो विद्यार्थी या परीक्षा देतात. तसेच एलिमेंटरी व इंटरमिजिएट पास झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये वाढीव गुण मिळतात. मागील वर्षी अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षांमुळे मिळणाऱ्या अतिरिक्त गुणांचा फायदा झाला. परंतु सद्यःस्थितीमध्ये या परीक्षा होतील की नाही, अशी शंका निर्माण होत आहे. परंतु परीक्षा घेतली गेली नाही तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. अगोदरच विद्यार्थ्यांना कोरोना संकट कालावधीमुळे प्रत्यक्ष शिक्षण मिळत नाही. त्यामुळे त्यांचा गुणांचा टक्का घसरण्याची शक्यता वाटते. दहावी व बारावीच्या परीक्षा होणार आहेच, त्यापूर्वीच शासकीय कला परीक्षांचे नियोजन होणे गरजेचे आहे. मागील वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी परीक्षा दिलेली आहे. त्यांना या वर्षी इंटरमिजिएट परीक्षा द्यायची आहे. तसेच अनेक नवीन विद्यार्थ्यांना एलिमेंटरी परीक्षा द्यायची आहे. त्यांची घरी बसून तयारीही चालू आहे. परंतु परीक्षांबाबत शासनाकडून ठोस कुठलाही निर्णय घेतले जात नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. इतर परीक्षांसोबत शासकीय चित्रकला परीक्षा ही घेतल्याच गेल्या पाहिजे. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्यास कलाशिक्षक व कला विद्यार्थ्यांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल.

हेही वाचा >> बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत

परीक्षांसाठी आवश्यक सर्व नियमांचे पालन करून या परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद साळुंके, कलाशिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सांगळे, भगवान तेलोरे, सचिन पगार, चंद्रशेखर सावंत, रमेश वारे, मिलिंद टिळे, रमेश तुंगार, बापूसाहेब वाघ, धनंजय सोनवणे, कमलाकर शेवाळे, संतोष मासाळ, योगेश रोकडे, संजय बोरसे, राम लोहार, योगेश राजोळे, सारंग घोलप, मनोज मोगरे, प्रशांत इपर, संदीप पांडे, प्रशांत पांडे आदींनी केली आहे. 

कोरोना संकटामुळे आजमितीस विद्यार्थ्यांना या परीक्षा सहाय्यक ठरू शकतात म्हणून परीक्षा घेतल्याच गेल्या पाहिजे. या संदर्भात कला संचालनालयाने त्वरित निर्णय घ्यावा. 
-दत्तात्रय सांगळे, जिल्हाध्यक्ष, राज्य कलाशिक्षक महासंघ, नाशिक 

हेही वाचा >> खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय