चित्रकारांची पोर्ट्रेट रांगोळीही वाढवतेय सौंदर्य

नाशिक : अंजली राऊत

रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे. सुरेख रेखीव आकारातून साकारलेल्या कलाकृतीने घराचे अंगण सुशोभित करून आलेल्या पाहुण्यांचे व सण-उत्सवाचे स्वागत करणे म्हणजे रांगोळी. रांगोळी कला मुली किंवा महिलांनाच अवगत आहे असे नाही, तर पुरुषही यात आघाडीवर आहेत. भव्य-दिव्य अशा आकर्षक रांगोळी चित्रांमधून कलात्मकता सादर करणाऱ्या या चित्रकारांना मोठी मागणी आहे. रांगोळी कलेमध्येही खूप प्रगती झाली असून, आता वेगवेगळ्या विषयांवर 2 डी 3 डी रांगोळीही काढली जाते. तसेच, पोर्ट्रेट रांगोळीला विशेष महत्त्व असल्याने दीपोत्सवात या रांगोळी चित्रकारांना खास निमंत्रण दिले जाते. कंपन्यांसह दुकाने, घरे, कलादालने, खासगी आस्थापना, शासकीय-निमशासकीय कार्यालयांचे सौंदर्य आपल्या कलेतून खुलविणाऱ्या अशाच काही रांगोळी चित्रकारांशी साधलेला संवाद…

सध्या रांगोळीमध्ये ‘लेक कलर’ हा प्रकार लोकप्रिय होत आहे. लेक कलर म्हणजे छोटे रंगीत खडे असतात. तो छोटा रंगीत खडा पांढर्‍या रांगोळीत घासून त्यापासून भरपूर रंग तयार होतो. साध्या रांगोळीपेक्षा हे लेक कलर मात्र फार महाग असतात. ते ग्रॅममध्ये मिळतात. शक्यतो हे कलर पुणे, सांगली मुंबईतच मिळतात. आमच्यासारखे व्यावसायिक रांगोळीकार कलाकार हे कलर वापरतात. या रांगोळीच्या सहायाने देवदेवतांची, नेत्यांची व सिनेतारकांची व प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाची व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, पोस्टर्स काढण्याची कला जोपासली गेली आहे. दिवाळीत पुणे, मुंबईमध्ये अशा रांगोळ्यांची मोठ्या प्रमाणावर प्रदर्शने भरविली जात आहेत.

– सोमेश्वर मुळाणे, रांगोळी चित्रकार, मखमलाबाद, नाशिक.

सध्याच्या काळात अनेक धार्मिक, सामाजिक व पर्यावरण विषयक रांगोळ्या काढल्या जातात. मुक्तहस्त चित्रात्मक रांगोळी असा कलाप्रकारही विकसित झालेला दिसून येतो. पोर्ट्रेट रांगोळीला पसंती दिली जात असून, त्यासाठी लेक पावडरचा वापर केला जातो. लेक पावडरला पांढऱ्या रांगोळीत घासून रांगोळी केली जाते. या रांगोळीला जास्त चमक असल्याने चित्र खुलून दिसते.

– सुरेश म्हैसधुणे, रांगोळी चित्रकार, कलाशिक्षक, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल.

सध्या रांगोळी कलेत रासायनिक रंगांचाही वापर होऊ लागला आहे. आम्ही रांगोळी चित्रांसाठी लेकरंग व पिगमेंट रंग वापरतो. हे रंग साधारणत: १०० ते १५० रुपये प्रति १०० ग्रॅम या दराने मिळतात. सध्या पुणे, सांगली, मुंबई येथून आम्ही सर्व रांगोळी कलावंत हे रंग मागवताे. व्यक्तिचित्रात सध्या हायपर रियॅलिस्टिक रांगोळीचे प्रयत्न आम्ही करतो आहोत.

– प्रमोद आर्वी, रांगोळी चित्रकार, साई आर्ट क्लासेस, मालेगाव.

व्यक्तिचित्रासाठी लेक कलरचा वापर केला जात असून, लेक कलर खूप महाग आहेत. कलरवर किंमत ठरवली जाते. काळा, लाल रंगासाठी जास्त खर्च होतो. नाशिकमध्ये लेक कलर सहसा मिळत नाही. पावडर स्वरूपामध्ये असणारे हे रंग फक्त पोर्ट्रेट रांगोळीसाठी वापरले जातात. पोर्ट्रेट रांगोळीसाठी तसेच संस्कार भारतीसाठी क्लासेसही घेतले जातात. पोर्ट्रेट रांगोळीचे क्लासेसही घेतले जातात.

– सुरेश सारासर, रांगोळी विक्रेता व लेक कलर विक्रेता.

पोर्ट्रेटसाठी लेक, पिगमेंट कलर

लेक कलर हे खड्यांच्या, तर पिगमेंट कलर पावडर स्वरूपात मिळतात. हे पावडर रंग साध्या पांढऱ्या रांगोळीमध्ये मिश्रण करून त्यामध्ये पाण्याचे ३ ते ४ थेंब टाकून १५ ते २० मिनिटे एकजीव होईपर्यंत रांगोळीला घासून तयार करावे लागतात. हे मिश्रण पोर्ट्रेट रांगोळीसाठी वापरले जाते.

हेही वाचा :

The post चित्रकारांची पोर्ट्रेट रांगोळीही वाढवतेय सौंदर्य appeared first on पुढारी.