चिमुरडीचा जीव घेणार तो नरभक्षक अखेर जेरबंद; मात्र परिसरात दहशत कायम

खेडभैरव (नाशिक) : तालुक्यातील बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून पूर्व भागात नागरिकांवर बिबट्याचे हल्ले करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. काही दिवसांपुर्वी कविता आनंदा मधे (वय.6) हीच्यावर बिबट्याने झडप घालून तिला डोंगराच्या दिशेने फरपटत नेले. यात तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गाव परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले होते. 

अजूनही परिसरात बिबटे 

पिंपळगाव मोर (ता. इगतपुरी) येथील जवळच असणाऱ्या भैरवनाथ मंदिराच्या परिसरातील वस्तीवरील येथील कविता आनंदा मधे (वय.6) हीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. चिमुरडीवर हल्ला केला त्या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात आज मंगळवारी (ता.1 ) रोजी  बिबट्या जेरबंद करण्यात आला. याआधी देखील सात दिवसांपूर्वीच वनविभागातर्फे लावलेल्या पिंजऱ्यात एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते. गेल्या आठवड्यात (दि.24 ) रोजी पहाटेच्या सुमारास एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. त्यामुळे अजूनही परिसरात बिबटे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा >> खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय

वनविभागाला यश

गेल्या आठवड्यात जेरबंद झालेल्या बिबट्यापेक्षा आजचा बिबट्या लहान असून साधारण चार ते साडे चार वर्षांचा असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वनपाल एकनाथ भले, वनरक्षक रेश्मा पाठक ,मालती पाडवी, फैजअली सय्यद,संतोष बोडके, बी.एस.खाडे, गोविंद बेंडकोळी, दशरथ निरगुडे, आदी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

हेही वाचा >> बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत

अजून काही दिवस पिंजरे ठेवावे

गावातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतीकडे पाणी देण्यासाठी जीव मुठीत घेऊनच जावे लागते आहे  त्यामुळे गावकाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.  पिंपळगाव मोर व परिसरातील भागात दररोज बिबट्याचे दर्शन होत  दोन दिवसांपूर्वी धामणी येथे देखील सायंकाळच्या वेळेस बिबट्या दिसला होता. परिसरात अजूनही चार ते पाच बिबटे असल्याच्या छुप्या चर्चाही होत आहेत. त्यामुळे अजून काही दिवस पिंजरे ठेवावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.