चुकीच्या फलकामुळे पर्यटक दिशाहीन; नांदूरमध्यमेश्‍वर अभयारण्याकडे जाताना वाहनचालकांना मनस्ताप 

नांदूरमध्यमेश्‍वर (जि. नाशिक)  : नांदूरमध्यमेश्‍वर धरणाच्या सर्व्हिस रोडवरुन वाहनांना परवानगी नसल्याने पक्षी अभयारण्याकडे जाता येत नाही. मात्र, वन्यजीव विभागाने दिंडोरी तास फाट्यावर रस्त्याच्या दुतर्फा कमानीवर ‘नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्य’ असा चुकीचा फलक लावलेला आहे. त्यामुळे पक्षीनिरिक्षणासाठी ठिकठिकाणावरुन येणाऱ्या पर्यटकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत असून, वन्यजीव विभागाला ना खेद ना खंत असल्याचेही दिसून येत आहे. 

पर्यटकांना विनाकारण होतोय मनस्ताप

नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात पक्षीनिरिक्षणासाठी व पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी ठिकठिकाणाहून येणाऱ्या पर्यटक, पक्षीमित्रांची वर्दळ असते. त्यातही विकेंडला तर दुचाकी, चारचाकी व सायकलस्वारांनी रस्ता फुलून जातो. पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी नाशिक परिसरातून येणारे काही पर्यटक सायखेडामार्गे, निफाडमार्गे तर काही जिल्ह्याच्या पूर्वभागाकडून शिवरे फाट्यावरुन अभयारण्याकडे येतात. मात्र, दिंडोरी तास फाट्यावर नांदूरमध्यमेश्‍वर धरणाकडे जाणाऱ्या मार्गावरील कमानीवर वन्यजीव विभागाने ‘नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्य’ असा चुकीचा फलक लावल्याने पर्यटकांचा गोंधळ उडतो आणि याच रस्त्याने पुढे पर्यटक जातात. धरणावरील रस्ता खासगी वाहतुकीला बंद आहे. असे असले तरी धरणावरील रस्त्यावर पाटबंधारे विभागाने ठिकठिकाणी रॕम्प टाकून रस्ता बंद केलेला आहे. त्यामुळे पर्यटकांना तीन किमी हकनाक दूरवरुन नांदूरमध्यमेश्‍वर गावापासून अभयारण्याकडे जावे लागते. या चुकीच्या फलकाबाबत पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. पर्यटकांना अभयारण्याकडे जाण्यासाठी दिंडोरी तास फाट्याजवळ दिशादर्शक फलक लावण्याची मागणी होत आहे. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल