चेन्नईतील पाच जणांचा नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकवून पोबारा

crime

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चेन्नईमधील संशयितांनी नाशिकमध्ये आयटी कंपनी सुरू करण्यासाठी वासवानी रोडवरील फ्लॅट घेताना करारानुसार ठरलेले वीजबिल न भरता पाेबारा केला. तब्बल एक कोटी ६५ लाखांचे वीजबिल थकले असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चेन्नई येथील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

समील माधवराव चव्हाण (रा. सुचितानगर, मुंबई नाका) यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी स्वामी एंटरप्रायजेस या नावाची आयटी कंपनी साधू वासवानी रोडवरील अंबिका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सुरू केली होती. चव्हाण यांच्या कंपनीमार्फत एमएसईडीसीएल व एमपीएसएल या कंपनीशी वीजकरार करण्यात आला होता. या कराराअंतर्गत ठरल्याप्रमाणे वीजमीटरचे रीडिंग घेऊन त्याचा मोबदला स्वामी कंपनीने देणे अपेक्षित होते. परंतु संशयितांनी कमी मोबदला दिला. तसेच एक कोटी ६५ लाख ६२ हजार ३५७ रुपयांचे वीजबिल थकविले. कंपनीने त्यांचे कामकाज बंद करताना थकीत बिल न भरता फसवणूक करीत पसार झाले. हा प्रकार १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२३ या दरम्यान घडला. लेकू रेड्डी राजगोपाल (५८), मधुराम राजगोपाल (५५), अंजली राजगोपाल (३०), राजू जगन्नाथन (४७), मनीष जोशी (४०, सर्व रा. सिपकोट, आयटी पार्क, सिरुसेरी, चेन्नई) अशी फसवणूक करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा :

The post चेन्नईतील पाच जणांचा नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकवून पोबारा appeared first on पुढारी.