मालेगाव (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात टायपिंगच्या परीक्षेसाठी चोपडा तालुक्यातील चहार्डी येथून आलेला व गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह छावणी पोलिस ठाण्यासमोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खोलीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर विद्यार्थ्याने स्वतःच्या शर्टने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. कुलदीप उर्फ भटू सुधाकर पाटील (२६) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
कुलदीप हा येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात १९ जून रोजी टायपिंगची परीक्षा देण्यासाठी आला होता. दुपारी ११ ते १२.३० या वेळेत त्याने टायपिंगची परीक्षा दिली. परीक्षा चांगली झाल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले. कुलदीप घरी न परतल्याने त्याला सातत्याने फोन केले गेले. मात्र, त्याचा मोबाइल बंद असल्याने संपर्क होत नव्हता. दुसऱ्या दिवशी कुटुंबीय व नातेवाइकांनी त्याचा मालेगावी व इतरत्र शोध घेतला. मात्र, कुलदीप मिळाला नाही. यामुळे कुटुंबीयांनी कॅम्प पोलिस ठाण्यात कुलदीप बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. शनिवारी (दि. २२) सकाळी छावणी पोलिस ठाण्यासमोर बांधकाम सुरू असलेल्या एका दुकानाच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांसह नागरिकांनी सदर खोलीत प्रवेश केला असता खोलीतील पाइपाला शर्टने गळफास घेतलेला तरुण दिसून आला. त्याचा मृतदेह कुजलेला होता. याची माहिती बेपत्ता कुलदीपच्या नातेवाइकांना देण्यात आली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाहिला असता तो कुलदीपचाच असल्याचे उघड झाले. त्यामुळे कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.
पोलिसांसमोर आव्हान
कुलदीप टायपिंगची परीक्षा देण्यासाठी आला होता, तसेच परीक्षा चांगली गेल्याचा निरोप देतो. त्यानंतर मात्र त्याचा मोवाइल बंद येतो. तीन दिवसांनंतर त्याचा गळफास घेतलेला मृतदेहच आढळून येतो. यामुळे कुटुंबीयांसह नातेवाईक हादरले आहेत. कुलदीपने जीवनप्रवास का संपवला? याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
हेही वाचा: