चोरट्यांनीही शोधला लक्ष्मीपूजनाचाच मुहूर्त; मध्यरात्रीत केले सोन्याचे दुकान साफ

नाशिक : चोरट्यांनीही नेमका लक्ष्मीपूजनाचाच साधला मुहूर्त...संधी साधत दुकानावर आधीच पाळत ठेऊन असणार. मध्यरात्र होताच अंधाराचा फायदा घेत दुकानावर मारला डल्ला. हजारोंचा माल लंपास...वाचा काय घडले नेमके?

अशी आहे घटना

लक्ष्मीपूजन म्हंटलं की दिवाळीचा महत्वाचा दिवस...मात्र याचदिवशी खेडलेझुंगे येथील अलंकार सोन्याचे दुकान फोडून ६९ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. दरवर्षीप्रमाणे गणेश राजेंद्र चिंतामणी यांनी लक्ष्मीपूजन करुन दुकान बंद केले. शनिवारी (ता. १४) रात्री दोनच्या दरम्यान चोरट्यांनी दुकानावर मात्र हात साफ केला. वज्रेश्वरी अलंकार दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व शोकेशमध्ये ठेवलेल्या ट्रेमधील ३५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या मुरण्या, ५०० ग्रॅम चांदीच्या वस्तू किंमत ३० हजार, चार हजार रुपये किमतीच्या पितळी मूर्ती, असे एकूण ६९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत गणेश चिंतामणी यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.