चोरी-छुपे ४५ वर्षांखालील नागरिकांना लस? छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल 

सिडको (नाशिक) : कोरोनाच्या काळात काही खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्ण व नातेवाइकांकडून झालेला आर्थिक व मानसिक छळ, कोरोना टेस्टिंग लॅबमधील चुकीचे रिपोर्ट व आता शासनाचे नियम डावलून ४५ वर्षे वयोगटाच्या आतील नागरिकांना ‘चोरी छुपके’ देण्यात येत असलेल्या लसीचा धक्कादायक प्रकार सध्या नागरिकांमध्ये जोरदार चर्चिला जात आहे. 

पैसे देऊन व वशिलेबाजीच्या जोरावर ‘चोरी छुपके’ लस

एकीकडे केंद्र व राज्य शासनाच्या नियमानुसार केवळ ४५ ते ६० वर्षे वयोगटाच्या पुढील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्याचे आदेश असताना काही केंद्रे व हॉस्पिटलमध्ये अधिक पैसे देऊन व वशिलेबाजीच्या जोरावर ४५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील नागरिकांना ‘चोरी छुपके’ लस देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार नागरिकांत चर्चिला जात आहे. याबाबत ४५ वर्षांच्या आतील काही तरुणांची लस घेतल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

लस घेतल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल 

काही दिवसांपासून नाशिक शहरातील महापालिका व खासगी रुग्णालयात कोरोनाची लस देण्यात येत आहे. यामध्ये नियमाप्रमाणे ४५ वर्षांच्या पुढील वयोगटातील नागरिकांना काही आजार असेल अशांना व ६० वर्षांच्या पुढील वयोगटातील नागरिकांना सरसकट लसीकरण करण्याचे शासनाचे आदेश आहेत. याकरता संबंधितांना ऑनलाइन ॲपद्वारे किंवा संबंधित केंद्रावर ओळखपत्र दाखवून नोंदणी करून लसीकरणाचा लाभ घेता येतो. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

वशिलेबाजीच्या जोरावर नियम तोडून लस
सध्या शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्यालाही लस मिळावी याकरिता ४५ वर्षांच्या आतील काही जण अधिक पैसे देऊन, तर काही जण वशिलेबाजीच्या जोरावर शासन नियम तोडून लस घेत आहेत. या संदर्भात योग्य ती शहानिशा करून जिल्हा शल्यचिकित्सक व महापालिका वैद्यकीय अधीक्षकांनी संबंधित प्रकाराला आळा घालणे जरुरीचे आहे. नियम मोडणाऱ्या केंद्र व खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांत व्यक्त होत आहे. 

पंचेचाळीस वर्षांच्या आतील नागरिकांना जर एखादे खासगी रुग्णालय लस देत असेल तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा प्रकार कुठे सुरू असल्यास संबंधितांनी महापालिका वैद्यकीय अधीक्षकांकडे रीतसर तक्रार करावी, याची जरूर नोंद घेतली जाईल. 
-डॉ. नवीन बाजी, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, श्री स्वामी समर्थ रुग्णालय