नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्ज माफिया ललित पानपाटीलला पुणे पोलिसांनी गुरुवारी (दि. २) नाशिकला चौकशीसाठी आणले होते. मात्र याबाबत पोलिसांनी गुप्तता राखली होती. ललितच्या घरासह इतर ठिकाणीही पोलिसांनी ललितला नेऊन पाहणी केल्याचे सूत्रांकडून समजते.
पुणे येथील ससून रुग्णालयात उपचाराच्या बहाण्याने ललित पानपाटीलने एमडी ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचे आढळले. पुणे पोलिसांनी रुग्णालयाच्या आवारातून काेट्यवधी रुपयांचा ड्रग्जसाठा पकडला. दरम्यान, ललित हा ऑक्टोबर महिन्यात रुग्णालयातून पसार झाला होता. तपासात ललितने त्याचा भाऊ भूषण व मित्र अभिषेक बलकवडे यांच्या मदतीने नाशिकच्या शिंदे गावात कारखाना टाकून एमडी तयार करत असल्याचे उघड झाले. मुंबई पोलिसांनी ललितला पकडले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर पुणे पोलिसांनी ललितचा ताबा घेतला. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला गुरुवारी नाशिकला आणले. एमडीविक्रीतून कमवलेल्या पैशांची गुंतवणूक कोठे व कशी केली, याचा शोध पुणे पोलिस घेत आहेत. तसेच कारखान्यातून किती एमडी तयार केले, त्याची विक्री कोणाला केली याबाबतही पोलिस तपास करीत आहेत.
पाच किलो सोने जप्त
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ललितने ड्रग्जविक्रीतून कमवलेल्या पैशांमधून आठ किलो सोने व इतर चांदी विकत घेतल्याचे समोर आले. पोलिसांनी तपास करीत भूषण व अभिषेकच्या ताब्यातून तीन किलो सोन्याची विटा जप्त केल्या, तर नाशिक पोलिसांनी संशयित अर्चना निकमकडून सात किलो चांदी जप्त केली. मात्र आता आणखी उरलेले पाच किलो सोने पोलिसांनी जप्त केले आहे. त्यासाठी पुणे पोलिस ललितसोबत नाशिकला आले होते.
हेही वाचा :
- Nashik News : शैक्षणिक पात्रता नसतानाही पदोन्नती; टोकडेतील शिक्षक भरती प्रकरणी गुन्हा
- मला जीवे मारण्याच्या हेतूनेच घरावर हल्ला : आमदार प्रकाश सोळंके
- ‘माझी शेवटची स्पर्धा…’ ; जलतरणपटू वीरधवलने जाहीर केली निवृत्ती
The post चौकशीसाठी ललितची पुन्हा नाशिकवारी appeared first on पुढारी.