छगन भुजबळ गैरहजर राहिल्यास वॉरंट बजावण्याचा न्यायलयाचा इशारा

छगन भुजबळ pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून आपल्या रोखठोक भूमिकेने सध्या चर्चेत आहे. त्यातच मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना कलिना भूखंड गैरव्यवहारप्रकरणी पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीला गैरहजर राहिल्यास वॉरंट बजावण्याचा इशारा सत्र न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा भुजबळ चर्चेत आले आहे.

कलिनामधील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय उभारणीच्या कंत्राटामध्ये गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. छगन भुजबळ हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदी असताना हा गैरव्यवहार झाला होता. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भुजबळ यांच्यासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. या खटल्याची मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यासाठी मंत्री भुजबळ यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे.

28 जून रोजी पुढील सुनावणी

न्यायालयाने इशारा देताना म्हटले आहे की, तुम्ही अनेकदा तारखांना गैरहजर राहिला आहात. पुढील सुनावणीसाठी हजर राहा, अन्यथा वॉरंट बजावले जाईल, असा तोंडी इशारा देत भुजबळ यांचा सुनावणी पुढे ढकलण्याचा अर्ज फेटाळला. तसेच पुढील सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. याप्रकरणी आता 28 जून रोजी सुनावणी होणार आहे.

हेही वाचा: