छगन भुजबळ पंतप्रधानांची भेट घेणार, करणार ‘ही’ मोठी मागणी

Chhagan Bhujbal

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- देशात जातनिहाय जनगणना झाली, तर त्याचा नक्कीच ओबीसींना फायदा होणार आहे. केंद्रातून एससी एसटी प्रवर्गाला जसा निधी मिळतो तसा ओबीसींनादेखील मिळेल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.

काय म्हणाले भुजबळ?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करणार आहोत.
  • या जनगणनेमधून ओबीसींच्या विविध मुद्द्यांवर प्रकाश पडेल.
  • नुसतीच लोकसंख्या समजणार नाही, तर ओबीसींची परिस्थितीदेखील स्पष्ट होईल.

मुंबईत झाली बैठक

भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेची बैठक मुंबईतील एमईटी येथे पार पडली. या बैठकीला समता परिषदेचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांसमोर जातनिहाय जनगणनेचा पुनरुच्चार केला आहे. तसेच ओबीसींसाठी लक्ष्मण हाके यांच्यासह आणखी लोक उपोषण करत आहेत. त्यांना माघार घेण्याची विनंती केली आहे. ओबीसींवर अन्याय होत असेल, तर त्यासंदर्भात योग्य ती भूमिका भविष्यात घेऊ आणि आपल्या मागण्या सरकारकडे मांडू. सरकारने ऐकले नाही, तर स्वत: आंदोलनात उतरणार असल्याचे भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

भुजब‌ळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पदाची शपथ घेतली आहे. त्यांची भेट घेत त्यांच्याकडे जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करणार आहोत. या जनगणनेमधून ओबीसींच्या विविध मुद्द्यांवर प्रकाश पडेल. नुसतीच लोकसंख्या समजणार नाही, तर ओबीसींची परिस्थितीदेखील स्पष्ट होईल. त्यामुळे केंद्र सरकारकडून सध्या केवळ अनुसूचित जाती जमातींना मिळणारा निधी ओबीसींनादेखील मिळू शकेल. ही जनगणना राज्यपातळीवर करणे योग्य होणार नाही. कारण त्यातून केंद्राचा निधी मिळणार नाही. आपल्याला फक्त ओबीसींच्या संख्येबाबत माहिती मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साहेब, जरा वेगळा विचार करा

लोकसभेसोबतच राज्यसभेसाठी आपल्याला उमेदवारी नाकारली आहे. त्यासोबतच पक्षांतर्गत गटबाजी सुरू आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तसाच आहे. त्यामुळे आमचा रोष वरिष्ठांवर आहे. साहेब आता आपण काहीतरी वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे. ओबीसींची ताकद आपल्यामागे आहे, अशा अपेक्षा परिषदेच्या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा –