येवला (जि. नाशिक) : तालुक्यातील जऊळके ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती खैरनार यांचे रद्द केलेले सरपंच पदाचे आदेश उच्च न्यायालयाने रद्द केल्याने, जऊळके ग्रामपंचायत थेट सरपंच पदाची पोट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील दि.०३/१०/२०२३ चे आदेशान्वये ग्रामपंचायत सार्वत्रिक / पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला होता. त्यानुसार जऊळके ता. येवला या ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच व १ ग्रामपंचायत सदस्य या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली होती.
त्यानंतर दिनांक १८/१०/२०२३ रोजी ज्योती प्रभाकर खैरनार यांनी निवडणुक निर्णय अधिकारी जऊळके यांचेकडे अर्ज सादर करून, मा. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील रिट पिटीशन क्र.८३१०/२०२३ दिनांक ११/१०/२०२३ (प्राप्त दि. १८/१०/२०२३) रोजीचे आदेशानुसार मा. अपर जिल्हाधिकारी नाशिक व मा. अपर आयुक्त नाशिक यांचा सौ. ज्योती खैरनार यांचे रदद केलेले सरपंच पदाचे आदेश रद्द केलेले आहेत, असे कळविले. तसेच त्यांनी थेट सरपंच पदाची पोट निवडणूक मा. उच्च न्यायालयाचा आदेश त्यांचे लाभात झाल्याने थांबवावी असे कळविले.
निवडणुक निर्णय अधिकारी जऊळके यांचेकडे शारदा संपत खैरनार यांनी दिनांक १६/ १० / २०२३ रोजी ग्रामपंचायत जऊळके येथील थेट सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेले होते. अशाप्रकारे सदर जागेकरीता सद्यस्थितीत एक अर्ज प्राप्त झाला होता.
मा.उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील रिट पिटीशन क्र.८३१०/२०२३ दिनांक-११/१०/२०२३ ( प्राप्त दि. १८/१०/२०२३) रोजीचा आदेश ज्योती प्रभाकर खैरनार यांचे लाभात झाल्याने, जऊळके ता. येवला या ग्रामपंचायतीची थेट सरपंच पदासाठीची पोट निवडणूकीची प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर तात्काळ थांबविण्यात येवून अहवाल सादर करावा, असे पत्र नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय स्वाती थविल, प्र. उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन )यांनी येवला तहसीलदार कार्यालयास पाठवले आहे.
The post जऊळके ग्रामपंचायत थेट सरपंच पदाची पोट निवडणूक स्थगित appeared first on पुढारी.