जखमी पशू-पक्ष्यांचे अनाथालय चालविणारे शरद पांडे! ‘मिनी झू’ चे साऱ्यांनाच आकर्षण

नाशिक : पंचवटीमधील निमाणी मंगल कार्यालय आज बंद असले तरी इथे गेल्या दहा वर्षांपासून शहरातील जखमी पशू-पक्ष्यांची सेवा अखंड सुरू आहे. पशू-पक्ष्यांचे अनाथालय चालवताहेत शरद पांडे हे अवलिया. एक सामान्य माणूस इच्छाशक्ती प्रखर असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो, हे पांडे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून दिले आहे. गायींच्या पोटात प्लॅस्टिक जाऊ नये म्हणून ते जनजागृती करतात. 

पंचवटीत जखमी पशू-पक्ष्यांचे अनाथालय चालविणारे शरद पांडे. 
अनाथालयात ५० पक्षी-प्राणी आहेत. त्यामध्ये दोन घारी, शराटी, रस्त्यावर सापडलेले श्वानाची आणि मांजराची पिल्ले, गीज, कोंबड्या, ससे, गीनिपिक, पारव आणि दहा गायी श्री. पांडे सांभाळत आहेत. कोरोना महामारीमध्ये अनेक पक्षी-प्राणी अनेक कारणांनी जखमी होतात. त्यांना पांडे अनाथालयात आणून उपचार करतात. पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉ. वेंदे व डॉ. पवार हे त्यांना सहकार्य करतात. या परिसरात फेरफटका मारताना आपण ‘मिनी झू’मध्ये फिरत नाही ना, असे वाटते. अनेक व्यक्ती हौसेसाठी पक्षी- पाळीव प्राणी पाळतात. आजारी पडल्यावर त्यांना रस्त्यावर सोडून देतात. अथवा  पांडे यांच्याकडे सोपवितात. त्यांच्याकडे बुलडॉग हा महागडा श्वान त्वचेच्या आजारामुळे अमेरिकेतून आला आहे. तो आता ९० टक्के बरा झाला आहे. 

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप

दीडशे झाडांची लागवड
दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या पांडे यांनी आपल्या कन्येला अभियंता केले आहे. पशू-पक्ष्यांसाठी रोज एक हजार रुपयांचे खाद्य लागते. हा खर्च त्यांना त्यांचे मित्र, सामाजिक कार्यकर्ते देतात. त्यांनी इथे टाकाऊतून टिकाऊचा प्रयोग करत दीडशे झाडांची लागवड केली आहे. भंगारातील ‘बाथ टब’चा उपयोग पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी आणि रोपे संवर्धनासाठी केला आहे. प्लॅस्टिकच्या जुन्या बाटल्यांमध्ये रोपे लावली आहेत. 

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार

समाजामध्ये आम्ही कितीही चांगले काम करत असलो तरी लोक आमच्याकडे वेगळ्या भावनेने पाहतात. आम्हाला वन विभागाने पक्षीमित्र म्हणून ओळखपत्र द्यायला हवे. तसेच नायलॉन मांज्या आणि प्लॅस्टिकला कायमस्वरूपी बंदी घातली जावी. तसेच नाशिकमध्ये ट्रान्झिट सेंटर लवकर सुरू होणे आवश्यक आहे. -शरद पांडे, पंचवटी