जगण्याने छळले, मरणानेही नाही सुटका! गोदावरी-दारणेच्या काठी महामारीत माणुसकीही आटली

नाशिक : अपुऱ्या सोयीसुविधांमुळे नाशिक रोडमधील कोविड सेंटरमध्ये अनागोंदीसदृश स्थिती असून, कोरोना उपचारापासून तर मेल्यानंतर महापालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला सरण रचण्यापर्यंत प्रत्येक पातळीवर कर्मचारीच नाही. तुमचे लोक बोलावून घ्या, असे म्हणत नागरिकांना त्यांच्या नातेवाइकांची काळजी घ्यावी लागते. दुर्दैव म्हणजे काही स्मशानभूमीत माणूस मेल्यांच दुःख विसरून ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना पैसे देऊन वेळ मारून न्यावी लागते. केवळ कोरोनाच नव्हे, तर सामान्य मृत्यू आलेल्यांच्या नशिबी हीच परवड आली आहे. त्या मुळेच ‘जगण्याने छळले होते, मरणानंतही नाही सुटका’ अशी अवस्था कोरोनाबाधितांची व त्यांच्या कुटुंबीयांवर आली आहे. 

प्रशासनाने नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयाची तीनशेहून थेट सातशे बेडपर्यंत क्षमता वाढविली. मात्र, त्याप्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून दिलेले नाही. वाढत्या महामारीत महापालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांनाही लागण झाली आहे. त्या मुळे जेमतेम ३५ कर्मचाऱ्यांवर पाचशेहून अधिक कोरोनाबाधितांच्या उपचाराचा गाडा हाकलला जात आहे. विस्तीरकरणात नवीन मशनरी आल्या; पण त्यातील काही मशिनरीसाठी अवघ्या पन्नास रुपयांचे कनेक्टरही नाही. ज्या केंद्राकडून या मशनरी आल्या तेथील कंपनीचे लोक साधा दूरध्वनी उचलत नाही. त्या मुळे व्हेंटिलेटर असूनही सहा ते सात खाटा वापराअभावी पडून आहे, असेही सांगण्यात आले. 

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा  

नातेवाईकच करतात शुश्रूषा 

रेमडेसिव्हिरपासून तर बेडपर्यंत प्रत्येक बाबतीच सामान्यांना संघर्ष करावा लागतो आहे. अशा स्थितीत महापालिकेच्या नव्या कोऱ्या कोविड सेंटरवर रुग्णसंख्येचा प्रचंड ताण वाढला आहे. रुग्ण वाढले, ताण वाढला, पण कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका मात्र वाढलेल्या नाहीत. त्या मुळे बाहेरच्या परिस्थितीला कंटाळून उपचाराला आलेल्या रुग्णांच्या शुश्रूषेला कर्मचारी पुरत नाही. डोळ्यांदेखत रुग्णांचे नातेवाइकांना हाल बघवत नाही. त्या मुळे कोरोनाचा धोका पत्करून अनेक नातेवाईक कोविड केंद्रात येनकेन प्रकारे प्रवेश मिळवित स्वतःचा जीव धोक्यात घालून शुश्रूषा करतात. 

मृत्यूदाखले लिहायला वेळ नाही 

चोवीस तास बिटको कोविड सेंटरमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांच्या वाहनांनी आवार गच्च झाले आहे. तरीही लोक येतातच. त्या मुळे येणाऱ्यांचे केसपेपर काढायचे, मृत्यू झालेल्यांचे दाखले द्यायचे हे सगळे औपचारिक काम करायला कर्मचारी नाही. त्या मुळे महापालिकेने कोविड सेंटर आवारात टाकलेल्या तंबूत बसून प्रतीक्षा करण्यापलीकडे रुग्णांच्या नातेवाइकांच्या हातात काही नाही. 

मरणानंतरही यातना... 

कोरोनाबाधितांवरील उपचारपुरता हाच विषय मर्यादित नाही. माणूस मेल्यानंतर महापालिकेच्या स्मशानभूमी आहे तेथे जागा मिळविण्यापासून सगळी तयारी सोपी राहिलेली नाही. आधी फोन करायचा, तेथेही ठेकेदारांच्या कर्मचाऱ्याची मिन्नतवारी करायची, जागा निश्चित करायची, घरूनच पाच जण पाठवून स्वतःच लाकडं वाहून जेल रोडला अंत्यसंस्कार असतील तर पाणी द्यायला मडक घरूनच न्यायचे. देवळालीगावत ते ठेकेदारच देतो, पण जेल रोडला तेही मिळत नाही. हे सगळे करण्यासाठी अनेकांना मृताचे मरण सरण यांच्या साक्षीने पैसेही द्यावे लागतात, असेही नागरिकांचे अनुभव आहे. सत्यभामा गाडेकर, जगदीश पवार, सूर्यकांत लवटे अशा दोन-पाच नगरसेवकांचा अपवाद सोडला तर, एरव्ही प्रत्येक बाबतीत अग्रेसर दिसणारे बहुतांश नगरसेवक बिळात लपून बसले की काय, असे चित्र जेल रोडला अनुभवण्यास मिळते. एकूणच दारणा- गोदावरी तीरावरच्या नाशिक रोडला माणुसकीही आटली की काय? 
असे अनुभव येत आहेत. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

बिटको रुग्णालयात कनेक्टरअभावी सहा-सात नव्हे, तर फक्त दोनच बेड आहे. त्याविषयी संबंधित कंपनीशी कालच बोलणे झाले आहे. त्यानुसार संबंधित कंपनीचे लोक येऊन ते दुरुस्त करणार आहेत. 
-डॉ. बापूसाहेब नागरगोजे (वैद्यकीय अधिकारी महापालिका)