नाशिक, पुढारी वृत्तसेवा – कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे सर्व क्षेत्र व्यापले आहेत. त्याचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रातही होणार आहे. तरीही मानवाच्या मनातून प्रगटल्या भावना, सर्जनशीलता आणि अभिनवता कृत्रिम बुद्धीमत्तेपेक्षा नक्कीच वरचढ, श्रेष्ठ अन् अव्दितीय राहणार असल्याचा सूर जनस्थान फेस्टीव्हलच्या कलावंताशी गप्पा या चर्चासत्रात उमटला.
जनस्थानच्या वर्धपनदिनानिमित्त सुरु असलेल्या जनस्थान फेस्टव्हीलमध्ये बुधवारी(दि.१९) कलावंतांशी गप्पा हा चर्चात्मक कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये शिल्पकर्मी यतीन पंडीत, चित्रकर्ती पूजा गायधनी, सुलेखनकार निलेश गायधनी, चित्रकार स्नेहल एकबोटे यांनी सहभाग घेतला. भूषण मटकरी यांनी कलावंताशी संवाद साधला.
कलाकार कलेची पूजा करतात त्यात आध्यात्म असतेच आणि कलानिर्मितीतून सर्जनशील नवनिर्मिती घडत असते ती प्रक्रिया ध्यानावस्थाच असते, कलानिर्मिती कलाकाराला स्वानंद देते तशीच ती रसिकांनाही रिझवते, असे पूजा गायधनी यांनी सांगितले. स्नेहल एकबोटे म्हणाली, कलेने व्यक्तीला मानसिक आरोग्य सुधारते. कला कलाकारांच्या जगण्याला केवळ ऊर्जाच प्रदान करत नाहीत तर जगण्यात आनंदासह नवा अर्थ देते.
निलेश गायधनी म्हणाले, सुखलेन कलेतून कलाकारांची साहित्य वाचनाची आवड वाढते आणि त्यातून अक्षरलेखनाला नवा आयाम मिळतो. सुलेखनातून प्रत्येक शब्दातील अक्षरे जिवंत करताना त्याचा अर्थही उलगडून सांगत जातात, अक्षरातून सार्थ भाव प्रगटात तीच कलेची अभिरुची संपन्न करत जातात.
कलाभान, कलाजाण आणि कलेची साक्षरता निर्माण करायची असल्यास पालकांनी आपल्या पाल्यांच्या उत्स्फूर्त अभिव्यक्तीला बांध घालता कामा नये. कलाकार, पालक, शिक्षकांनी एकत्र येऊन नवीन पिढीतील मुलांमध्ये कलासाक्षरता निर्माण करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज सर्वच कलाकारांनी अधोरेखित केली. याप्रसंगी अभय ओझरकर, मुंजा नरवडे, सी. एल कुलकर्णी, संजय दुर्गावाड, विनोद राठोड, प्रणव सातभाई आदी उपस्थित होते.
कलासाक्षरता, दृश्यभान निर्माण होण्यासाठी…
प्रत्येक कलाकृती काहीतरी संवाद साधते. कलावंत त्याच्या कलानिर्मितीत कलाकृती तयार करताना जो भाव, संवाद, संदेश कलेतून देत असतो. कलावंताचा उद्देश, संवाद जरी रसिकांना जसाचा तसा समजला नाही तरी चालेल परंतु प्रत्येक कलाकृतीचा आनंद, संदेश कळण्यासाठी चित्र, शिल्प वाचता यावी, त्यासाठी अगोदर प्रदर्शनात जाऊन कलाकृती वाचण्याची सवय रसिकांनी लावल्यास कलासाक्षरता निर्माण होईल असाही सूर चर्चासत्रातून उमटला.
हेही वाचा: