जयंत पाटील यांची ईडी चौकशी, धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

जयंत पाटील ईडी चौकशी, धुळ्यात आंदोलन www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशी विरोधात धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष रणजीत  भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसने आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीला विरोध करीत निदर्शने केली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले. तर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. या निवेदनात देखील गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.

लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष आणि त्यांच्या अभिव्यक्तीला महत्त्व आहे. पण आज देशात विशेषतः बिगर भाजप शासित राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यासाठी लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून सत्तेचा गैरवापर होत आहे. ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग विरोधी
पक्षांची मुस्कटदाबी करण्यासाठी सत्ताधारी करत आहेत. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नाही तर अन्य विरोधी पक्षातील नेत्यांबाबतही हा प्रकार सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

विरोधकांवर सुरू असलेल्या दबावतंत्राला लोकशाही मार्गाने विरोध करणे हे निरोगी लोकशाही करिता आवश्यक आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आणि संविधांनकर्त्याना अपेक्षित लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी आपण आमची ही भूमिका केंद्र शासनास व राज्य शासनास कळवावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजीत  भोसले, जोसेफ मलबारी, जगन ताकटे, महेंद्र शिरसाठ, भिका नेरकर, मनोज कोळेकर, कुणाल पवार, सरोज कदम, शकीला बक्ष, राजेंद्र चितोडकर, राजेंद्र सोलंकी, चेतन पाटील, रामेश्वर साबरे, मयूर देवरे, भूषण पाटील, मसुद अन्सारी, निखिल पाटील, चेतन पाटील, सागर पाटील, भटू पाटील, गोरख अहिरे, जुनेद शेख, सतिष पाटील, प्रसाद दाळवाले, निलेश चौधरी, स्वामिनी पारखे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

The post जयंत पाटील यांची ईडी चौकशी, धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन appeared first on पुढारी.