जरीफबाबांच्या आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी विशेष चौकशी समिती

जरीफ बाबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील चिंचोडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुफी धर्मगुरू जरीफ अहमद चिश्ती (28) ऊर्फ जरीफबाबा यांचा संपत्तीच्या वादातून गोळी झाडून खून करण्यात आल्याची घटना घडली होती.

जरीफबाबा निर्वासित असल्याने त्यांना संपत्ती घेता येत नसल्याने त्यांनी इतरांच्या नावे संपत्ती खरेदी केल्याचे समोर आल्याने आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी विशेष तपासी पथक नेमण्यात आले आहे. मनमाडचे पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे हे पथकप्रमुख आहेत. जरीफबाबा यांचा 5 जुलैला सायंकाळी त्यांचा सेवेकरी व माजी चालकासह इतरांनी गोळी मारून खून केला होता. या प्रकरणी येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. जरीफबाबा हे निर्वासित म्हणून मागील पाच वर्षांपासून भारतात राहत होते. त्यामुळे त्यांना येथे स्थावर, जंगम मालमत्ता खरेदी-विक्रीचे अधिकार नव्हते. त्यांनी सुफी विचारप्रणाली, अध्यात्म, मानवता धर्माबाबत उपदेश करत त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत होते. सोशल मीडियापासून मिळणार्‍या उत्पन्नासह देणगीदारांकडूनही जरीफबाबांना पैसे मिळत होते. या पैशांतून त्यांनी त्यांचे सेवेकरी व कामास असलेल्यांच्या नावे मालमत्ता खरेदी केली आहे. त्यामुळे जरीफबाबांच्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे यांच्या नियंत्रणाखाली चौकशी होत आहे.

हेही वाचा:

The post जरीफबाबांच्या आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी विशेष चौकशी समिती appeared first on पुढारी.