जर्नादन महाराजांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास पाठिंबा देणार : रक्षा खडसे

रक्षा खडसे, जनार्दन महाराज www.pudhari.news

जळगाव : रावेर लोकसभेची उमेदवारी भाजपा पक्ष श्रेष्ठींनी प.पू.जनार्दन महाराज यांना दिल्यास भाजपा म्हणून त्यांचे निश्चितपणे काम करू, असे मत खासदार रक्षा खडसे यांनी येथे प्रसिद्धी माध्यमांपुढे व्यक्त केल्याने राजकीय गोटात प्रचंड चर्चा सुरू आहे. दरम्यान, खासदारांच्या वक्तव्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांना अद्याप आठ महिन्यांचा अवधी बाकी असून रावेर लोकसभेतून निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. रावेरमधून भाजपातर्फे प.पू.जनार्दन महाराज यांनीच निवडणूक लढवावी, असा सूर उमटत असतांना दिव्यांग बांधवांच्या कॅम्प निमित्ताने सोमवार, 13 रोजी खासदार रक्षा खडसे रावेरात आल्या असता त्यांना माध्यमांनी याबाबत छेडले असता त्या म्हणाल्या की, भाजपा पक्षश्रेष्ठीने प.पू.जनार्दन महाराज यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास आपला त्यांना पाठिंबा असेल व आपण त्यांचे काम करू, असे त्या म्हणाल्या. निवडणुकीसाठी अनेक जण इच्छूक असतात, त्यात काही गैरही नाही मात्र तिकीट कुणाला द्यावयाचे याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही त्या म्हणाल्या.

भाजप उमेदवार बदलणार?

रावेर लोकसभा मतदार संघात सद्यस्थितीत रक्षा खडसे विद्यमान खासदार आहेत. मात्र, त्यांनी स्वत:च जनार्दन महाराज यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा प्रचार करणार असल्याची घोषणा खुद्द रक्षा खडसे यांनी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे जनार्दन महाराज यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जिल्ह्यात जनार्दन महाराज यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भाजप उमेदवार बदलाच्या विचारात तर नाहीना? अशी चर्चा रंगू लागली आहे.

हेही वाचा ; 

The post जर्नादन महाराजांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास पाठिंबा देणार : रक्षा खडसे appeared first on पुढारी.