जर्मनीपाठोपाठ यूकेसाठी द्राक्ष रवाना! युरोपामध्ये मात्र द्राक्ष निर्यातीला फटका

लासलगाव (जि.नाशिक) : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीनं जगाला भुरळ घालणाऱ्या नाशिकच्या द्राक्ष हंगामाला यंदा १ जानेवारीला सुरवात झाली. पहिला कंटेनर जर्मनीला रवाना झाल्यानंतर दुसरा २८.६०० टनांचा कंटेनर युनायटेड किंडमसाठी रवाना झाला आहे. १ जानेवारीपासून ११ जानेवारीपर्यंत नऊ कंटेनरद्वारे १२४ टन द्राक्ष जर्मनी आणि यूकेला निर्यात झाले आहेत. मागील हंगाम २०१९-२० मध्ये ११ जानेवारीपर्यंत २७ कंटेनरमधून ३६३ टन द्राक्ष निर्यात झाली होती. युरोपामध्ये पुन्हा लॉकडाउन असल्याने द्राक्ष निर्यातीला फटका बसला आहे. 

१ जानेवारीपासून १२४ टनांची निर्यात 
नाशिकची द्राक्षे युरोपीय देशांसह रशिया, चीन, कॅनडा, दुबई, जर्मनी, मलेशिया आदी देशांत पाठविण्यात येतात. जागतिक बाजारपेठेत भारतीय द्राक्षांची मागणी टिकून राहावी, यासाठी कृषी विभागाने द्राक्ष निर्यातीबाबत जनजागृती केली. तसेच निर्यातीसंबंधीचे निकष तपासून काटेकोरपणे कामकाज पार पाडले. नाशिकमध्ये यंदा द्राक्ष पिकाला पोषक वातावरण होते. त्यामुळे ४५ हजार १४ द्राक्षबागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली. भारतीय शेतमाल आणि फळबागेला बांगलादेश येथे मोठी मागणी आहे. केंद्र सरकारने बांगलादेशमध्ये द्राक्ष निर्यातीसाठी विशेष लक्ष देऊन वाहतूक खर्च आणि ड्यूटी कमी केली तर द्राक्ष निर्यातीस अजून वाव मिळेल. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

वाहतूक खर्च आणि ड्यूटी कमी केली तर द्राक्ष निर्यातीस अजून वाव मिळेल

२०१८-१९ हंगामात तब्बल दोन लाख ४६ हजार टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून २,३३५ कोटींहून अधिकाचे परकीय चलन देशाला मिळाले. त्यामुळे केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीसाठी नवनवीन बाजारपेठ शोधून आपल्याकडील शेतमाल जास्तीत जास्त कसा निर्यात होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. -कैलास भोसले  

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा