जलनेतीमुळे कोरोनापासून  बचाव शक्य; महापौर सतीश कुलकर्णी यांचा दावा

नाशिक : योगशास्त्रातील जलनेती क्रियेमुळे कोरोनाचा संसर्ग रोखता येणे शक्य असून, कोरोना संसर्गाने आजारी पडल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद, होमिओपॅथी उपचार पद्धती अत्यंत प्रभावशाली असल्याचा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे. 

कोरोनाबाधितांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती अत्यंत प्रभावशाली आहे. या पद्धतीत नियमितता आवश्यक आहे. योग शास्त्रातील जलनेती प्रक्रियादेखील अत्यंत प्रभावशाली उपचार पद्धती आहे. 
जलनेती योग शास्त्रामधील एक शुद्धी क्रिया आहे. यामध्ये जलनीती पात्राचा वापर केला जातो व हे पात्र बाजारात सहजपणे उपलब्ध होते. जलनेती पात्राची किंमत साधारणता ४० ते ५० रुपये इतकी आहे. या क्रियेत कोमट पाणी व सैंदव मिठाचा वापर केला जातो. या क्रियेमध्ये दोन जलपात्र भरून कोमटपाणी लागते. त्यातील एक जलपात्र डाव्या नाकपुडीसाठी व दुसरे जलपात्र उजव्या नाकपुडीसाठी लागते. यामध्ये कोमट पाणीच का घ्यावे, तर थंड पाणी नाकामध्ये गेल्यास त्याची सनक बसू शकते. ती सनक बसू नये याकरिता कोमट पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. सैंदव मिठामध्ये (रससोशक) ऑस्मॅटिक प्रेशर असल्याने तो नाकातील सायनसमध्ये लपून बसलेल्या व्हायरसला निष्क्रिय करतो व मारतो. कोमट पाण्यामुळे व्हायरस नाकामधील सायनसमधून बाहेर टाकला जातो. त्या मुळे व्हायरस फुफुसांपर्यंत पोचू शकत नाही. परिणामी, आजाराचे संक्रमणास अटकाव होऊन तो पुढे पसरत नाही.

जलनेती क्रिया घरात राहणाऱ्या व्यक्तीने दररोज एक वेळेस व बाहेर वावरणाऱ्या व्यक्तीने दिवसातून दोन वेळेस करणे गरजेचे आहे. जलनेती क्रिया ही कोरोनापासून बचाव करणेकरिता सहज साध्य होणारी व अत्यंत उपयुक्त तथा प्रभावशाली आहे. त्या मुळे कोरोनाचा प्रतिबंध चांगल्या प्रकारे होऊन आपण सुरक्षित राहू शकतो, असा दावा महापौर कुलकर्णी यांनी केला आहे. योगाचार्यांच्या माध्यमातून जलनेती क्रियेचे प्रशिक्षण लवकरच माध्यम प्रतिनिधींना दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा