जळगावच्या राजकारणाचे केंद्र बनले नाशिक; सांगली पॅटर्नकडे जळगावची वाटचाल 

नाशिक : सत्ता असलेल्या जळगाव महापालिकेत भाजपचा मोठा गट बाहेर पडला असून, शिवसेनेच्या गोटात दाखल झाल्याचे बोलले जात आहे. भाजप नगरसेवकांच्या या भुमिकेमुळे पक्षात मोठा राजकीय भुकंप झाला आहे. सांगली पॅटर्नकडे जळगावची वाटचाल सुरु झाल्याचे बोलले जात आहे. या निमित्ताने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक मानले जाणारे गिरीष महाजन पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

शिवसेनेत प्रवेशकर्ते होणारे नगरसेवकांनी रविवारी (ता.१४) नाशिक मुक्काम केल्यानंतर मुंबईत पोहोचल्याचे समजते, तर भाजपमध्ये सध्या राहीलेले वीसहून अधिक नगरसेवकांना नाशिकमध्ये सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता आहे. परंतु, स्थानिक राजकारणातून येत्या काही दिवसात होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीत २५ हून अधिक नगरसेवकांनी शिवसेनेचे बोट धरत सत्तांतर घडविण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आज दिवसभर नाशिकमध्ये होती. रविवारी २५ हून नगरसेवक नाशिकमध्ये मुक्कामी होते. सोमवारी सकाळनंतर बसने सर्व नगरसेवक मुंबईकडे निघाल्याचे सांगितले जात आहे. नगरसेवक फुटल्याने भाजपमध्ये मोठा भुकंप झाला असून, सध्या पक्षाबरोबर असलेले नगरसेवक सोमवारी (ता.१५) दुपारी नाशिकमध्ये दाखल झाले. इंदिरानगर भागातील एका हॉटेलमध्ये मुक्काम केल्यानंतर संध्याकाळी नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, किमान आहे ते नगरसेवक भाजपमध्ये राहतील यासाठी सुरक्षेचे कवच देण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

गिरीष महाजनांची कसोटी 

जळगाव जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या माजीमंत्री गिरीष महाजन यांची यानिमित्ताने कसोटी लागली आहे. यापूर्वी नाशिक महापालिका निवडणुकीत देखील सत्ता असतानाही भाजपचे नगरसेवक फुटले होते. परंतु, एनवेळी सुत्रे फिरवून महाजन यांनी नगरसेवक पुन्हा वळविल्याने भाजपची नाशिकमध्ये ईभ्रत वाचली होती. तोच नाशिक पॅटर्न जळगाव महापालिका महापौर निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे. यात महाजन यांचीच मोठी कसोटी लागली असून, नाशिकमधील डॅमेज कन्ट्रोल सावरण्यासाठी जे नगरसेवक सरसावले होते पुन्हा तेच नगरसेवक जळगाव साठी पुढे सरसावल्याचे दिसून येत आहे. जळगावच्या नगरसेवकांना सुरक्षा देण्याबरोबरचं तांत्रिक बाबींच्या माध्यमातून सत्तांतरणाचा डाव हाणून पाडण्यासाठी पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू