जळगावमध्ये ‘लम्पी स्किन’मुळे २८७७ पशुधन संसर्ग बाधित

लम्पी संसर्ग
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
‘लम्पी स्किन’ हा जनावरांना होणारा संसर्गजन्य आजार अवघ्या दहा दिवसांतच सर्व जिल्ह्यात वेगाने पसरत आहेत. कोविडसारखा हा आजारदेखील वेगाने गुरांमध्ये फैलावत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यत २८७७ पशुधन संसर्ग बाधित झाले आहे, तर १८४० पशुधनावर उपचार केले जात आहेत. यात आतापर्यत १२२ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकातर्फे पशुधनाच्या लसीकरणासह परिसरात मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
राज्यात सर्वप्रथम ४ ऑगस्टला जिल्ह्यात लम्पीची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर हा आजार झपाट्याने ११ सप्टेंबरपर्यंत अन्य २७ जिल्ह्यांमध्ये पोहचला असल्याचे दिसून आले आहे. जिल्हास्तरावरून पशुसंवर्धन विभाग प्रशासनाकडून स्थानिक स्तरावर संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू आहे. जिल्ह्यात ८ लाखांहून अधिक दुधाळ पशुधनाची संख्या आहे. त्यात पशुसंवर्धन विभागाकडे ५.५० हजार लस मात्रा उपलब्ध आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या लसमात्रेव्दारे सुमारे सव्वादोन लाखाच्या जवळपास पशुधनाचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. लसीकरणासाठी जिल्ह्यात २० सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी स्वेच्छेने पुढाकार घेतला असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.
जामनेर आणि बोदवड येथे तपासणी : जिल्ह्यात एकूण ५.५०  लाख लसीच्या मात्रा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या लस मात्रांपैकी बाधित क्षेत्राच्या ५ कि. मी. परिघासह अन्य गावातील २ लाख २३हजार ५१२ पशुधनाचे लसीकरण करण्यात आले असून विशेषतः गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तसेच पुणे येथील पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.परकाडे, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय (मापसु) चे डॉ.गायकवाड यांच्यासह ४ असिंस्टंट प्रोफेसर यांचे पथक जिल्हा दौर्‍यावर आले आहेत.  या पथकातर्फे जामनेर आणि बोदवड येथे लसीकरण मोहिमेसह पशुपालकांना पशुधनाची घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन केले जात आहे, असे उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन विभाग जळगाव डॉ. श्यामकांत पाटील यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

The post जळगावमध्ये ‘लम्पी स्किन’मुळे २८७७ पशुधन संसर्ग बाधित appeared first on पुढारी.