जळगावातील शेतकरी दुहेरी संकटात ; जनावरांवर ‘लम्पी’ तर केळीपिकावर ‘सीएमव्ही’ व्हायरस

जळगाव: सीएमव्ही रोग,www.pudhari.news

जळगाव : जळगाव जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर आहे. जळगावची केळी केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात विशेषत: रावेर तालुक्यात केळीचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. याच तालुक्यात मागील महिन्यांपासून लम्पी आजारानं थैमान घातलं आहे. हे संकट कमी होतं की काय म्हणून आणखी एक संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय. येथील केळी पिकावर सीएमव्ही ( CMV )नावाचा व्हायरस आलाय. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर आले असता, मंत्री गिरीश महाजनांनी सीएमव्ही रोगावर उपाययोजनांसह शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

जळगाव जिल्ह्यात नव्याने जुलै व ऑगस्टमध्ये लागवड झालेल्या १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात ३० टक्क्यावर प्रादुर्भाव झाला आहे. या बाधित क्षेत्रांची पाहणी भारत सरकारच्या कृषी व किसान कल्याण विभागाकडून तसेच नाशिक केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राच्या उच्चस्तरीय अधिकार्‍यांनी केली. नेह्ता येथील नत्थू पाटील या शेतक-याने नव्याने लागवड केलेल्या सुमारे २३ हजार रोपांमधील ११ हजार रोप उपटून फेकले आहे. तर केर्‍हाळे येथील चंद्रकांत अशोक पाटील व संजय पाटील यांचे देखील सीएमव्हीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यातील पातोंडी गावातील शेतकरी शिवाजी पाटील यांनी ११ एकरवर केळीची लागवड केली होती. यातील १० एकर केळीच्या रोपांवर सीएमव्ही व्हायरस आला. त्यामुळे शिवाजी पाटील यांना १० एकरातील केळी पीक उपटून फेकले. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या रोगावर कोणताही विमा नसल्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून किमान झालेला खर्च तरी नुकसान भरपाई द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

नगर: पीक विमा कंपनीकडे तक्रारींचा पाऊस, सात हजार शेतकर्‍यांचे पंचनामे प्रलंबित

हजारो हेक्टरवरील केळी पीक धोक्यात…
जळगाव केळी उत्पादनात जगात अग्रेसर मनाला जातो. या ठिकाणच्या केळीला एक विशिष्ठ प्रकारची चव आहे. त्यामुळे या केळीला जगभर मागणी असते. मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन होत असल्याने या केळी पिकावर जळगावची अर्थ व्यवस्था अवलंबून असल्याचं मानलं जातं, केळीच्या शेतीसाठी बैलांचा वापर करावा लागत असल्याने आणि मोठ्या प्रमाणात शेणखत लागत असल्याने या भागात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत. मात्र गेल्या महिनाभरापासून या भागात जनावरांवर लम्पी आजार पसरल्याने अनेक जनावरांचा मृत्यू झाला. तसेच हजारो गुरे बाधित झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यातच आता या भागातील मुख्य पीक असलेल्या केळी पिकावर सीएमव्ही म्हणजेच कुकुंबर मोझॅक व्हायरसने हल्ला केल्याने हजारो हेक्टरवरील केळी पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असल्याचं पाहायला मिळत आहे.

नगर: पीक विमा कंपनीकडे तक्रारींचा पाऊस, सात हजार शेतकर्‍यांचे पंचनामे प्रलंबित

उपाययोजनांवर भर देण्याचे आवाहन…
कृषी अधिकाऱ्यांच्या मते सीएमव्ही म्हणजेच कुकुंबर मोज्याक वायरस हा केवळ केळीवरच येतो असे नाही तर अन्य पिकांवर देखील येत असतो. मात्र सध्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लागवड करण्यात आलेल्या केळी रोपांवर याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याचा प्रसार मावा तुडतुडे आणि पांढरी माशी यामुळे होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारची कीटकं आपल्या शेतात केळी रोपावर दिसून आली तर त्यावर तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत. त्याच एका झाडापासून इतर झाडांना त्याचा प्रसार होत असल्याने बाधित झाडे लक्षणे दिसताच क्षणी उपटून फेकली पाहिजेत.

हेही वाचा :

The post जळगावातील शेतकरी दुहेरी संकटात ; जनावरांवर 'लम्पी' तर केळीपिकावर 'सीएमव्ही' व्हायरस appeared first on पुढारी.