जळगावात किरकोळ वादातून तरुणाचा खून

जळगाव : येथे गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले असून, किरकोळ वादातून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी (दि. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास शिवकॉलनीत घडली. अक्षय अजय चव्हाण (२३, रा. पिंप्राळा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

काही तरुणांमध्ये रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोबाइलवरून जुना वाद सुरू होता. हा वाद वाढत गेल्याने अक्षय चव्हाण या तरुणाने बाळू पवार याच्या भावाच्या डोक्यात दगड मारला. भावाला दगड मारल्याच्या रागातून संशयित बाळू पवारने चॉपरच्या साहाय्याने अक्षय चव्हाणवर हल्ला केला. जखमी अवस्थेत अक्षयला शासकीय रुग्णालयात आणले असता, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, रुग्णालयात नातेवाइकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलिसांकडून पाहणी…
पोलिस निरीक्षक अरुण धनवडे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी धाव घेत संशयिताची धरपकड सुरू केली होती. मृत तरुणाचा परिवार मध्य प्रदेशातून जळगावात 10 वर्षांपूर्वीच स्थायिक झाला होता. पिंप्राळा येथे मढी चौक ते राहात होते.

The post जळगावात किरकोळ वादातून तरुणाचा खून appeared first on पुढारी.