
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या केळीच्या बुंध्यापासून फायबर काढून कापड निर्मितीचा प्रकल्प सुरू करणार आहोत. यासाठी कंपनीला बाराशे कोटींचा इन्सेंटिव्ह उद्योग विभागाने दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. जळगाव तालुक्यातील भोकर येथे तापी नदीवर दीडशे कोटींतून पूल व जोडरस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे, खा. रक्षा खडसे, आ. सुरेश भोळे, आ. चंद्रकांत पाटील, आ. लता सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, भोकर येथे दीडशे कोटींतून पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या पुलामुळे जवळपास ७० किमी अंतर वाचणार आहे. हा पूल जळगाव आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यांना वरदान ठरणार आहे. चोपडामार्गे शिरपूरला जाणे सोपे होईल. चोपडा, जळगाव आणि धरणगाव या तिन्ही तालुक्यांतील जनतेला याचा लाभ होईल. येथील लोकांमध्ये कनेक्टिव्हिटी सोपी होईल, असे स्पष्ट केले.
सिंचनासाठी सरकार प्रयत्नशील
राज्यातील ३८ हजार योजनांना पाणीपुरवठा विभागाने मंजुरी दिली आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येकाला शुद्ध आणि पुरेसे पिण्याचे पाणी देणे पुण्याचे काम आहे. जळगावातील एक हजार कोटींच्या वाघूर प्रकल्पास मान्यता दिली. आतापर्यंत राज्यातल्या २२ जलसिंचन प्रकल्प जे थांबले होते त्याला मान्यता देण्याचे काम सरकारने केले आहे. यामुळे खऱ्या अर्थाने जवळपास अडीच ते पाच लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आली येणार आहे.
पाच ठिकाणी एमआयडीसी मंजुरी
धरणगाव, चोपडा, पाचोरा, मुक्ताईनगर आणि एरंडोल या पाच ठिकाणी एमआयडीसी करण्याचा देखील आपल्या सरकारने निर्णय घेतलेला आहे. जळगाव जिल्ह्यास १०० नवीन बसेस, जिल्ह्यातलं वारकरी भवन, हॉस्पिटलची उभारणी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यावल उपसा सिंचन योजनेसाठी ५९२ कोटी निधीचा विषय उपमुख्यमंत्री महोदयांकडे आहे. त्यांच्याशी भेटून हा विषय मार्गी लावणार आहे. निम्न तापी प्रकल्प ५४१ कोटींचा प्रकल्प आहे. त्याला शंभर कोटींच्या निधी मंजूर केला जाईल. या अर्थसंकल्पामध्ये त्याचा आपण समावेश करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अशी होईल धागानिर्मिती
केळी खोडापासून उत्कृष्ट प्रतीचा धागा बनू शकतो. धागा काढण्यासाठी खोडाचा वापर झाड कापल्यापासून चोवीस तासांच्या आत करावा लागतो. खोड कापून यंत्रावर धागा काढला जातो. प्रक्रियेदरम्यान निघालेले पाणी व लगदा वेगळे केले जाते. सुकवलेला धागा मोठ्या दाताच्या फणीने विंचरून घेतला जातो. त्यानंतर त्यास पॉलिश करून पांढरा शुभ्र धागा तयार होतो. हा धागा साधारणत: १०० ते १२० प्रतिकिलो विकला जातो. यापासून कापडनिर्मितीचा प्रकल्प जिल्ह्यात सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. केळीच्या धाग्यापासून बारीक दोरी, दोरखंड, पिशव्या, पायपुसणी, चटई, आकर्षक टोप्या, कापड, साड्या, शोभेच्या वस्तू, क्राफ्ट पेपर, टिश्यूपेपर, फिल्टर पेपर, पृष्ठ, फाइलसाठी जाड कागद, सुटकेस, डिनरसेट, बुटांचे सोल, चप्पल इत्यादी वस्तू बनविता येतात.
हेही वाचा :
- सैफ अल आदेल ’अल कायदा‘चा नवा म्होरक्या
- पुणे : येमेनी महिलेची वाचवली द़ृष्टी; डोळ्यांच्या टीबीच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी उपचार
- Breaking News : Earthquake : जम्मू काश्मीरमध्ये भूकंप
The post जळगावात केळीच्या बुंध्यापासून कापडनिर्मिती होणार appeared first on पुढारी.