Site icon

जळगावात गायीचे डोहाळे जेवण, छप्पन भोगाचा दाखविला प्रसाद

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

आपण आपल्या घरातील आईवर जेवढे प्रेम करतो तेवढंच प्रेम ग्रामीण भागात शेतकरी आजही गाईवर करतो. गर्भवती महिलेच्या बाळावर गर्भसंस्कार पार पडावेत. म्हणून गर्भवती महिलांची ओटी भरणे अर्थात डोहाळे जेवण कार्यक्रम आयोजित करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. जळगावातील कोल्हे परिवाराने आपल्या लाडक्या गायीचे डोहाळे जेवण घालून एक अनोखा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे गायीच्या या शाही डोहाळ जेवणाला छप्पन भोगाचा प्रसाद ठेवण्यात आला होता.

भारतीय संस्कृतीमध्ये गायीला वेगळे असे महत्व आहे. त्याचे महत्व तर अबाधित ठेवले जात आहे पण काही शेतकरी गायीचे केवळ पालनच करीत नाहीत तर डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही मोठ्या थाटामाटात पार पाडत आहेत. जळगाव शहरातील ज्ञानदेव नगरात असाच डोळ्याचे पारणे फिटेल असा सोहळा रंगलेला होता. शहरात प्रथमत:च असा आगळा-वेगळा कार्यक्रम झाल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. येथील नगरसेवक प्रविण कोल्हे यांच्या कुटुंबियांनी गायीचेच डोहाळे जेवण घातले. सर्वकाही विधीवत करुन परिसरातील महिलांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. आलेल्या सर्व महिलांसाठी खास पंचपक्वान पदार्थांची मेजवानी ठेवण्यात आली होती.

परिवारातील सदस्याप्रमाणे गाईचे पालनपोषण

गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हे कुटुंब राजकारणात आहे, गाय दारात असली की घर मंगलमय राहते अशी त्यांच्या वाड-वडीलांपासूनची श्रद्धा असल्याने अनेक वर्षा पासून त्यांच्याकडे गायीचे पालनपोषण केले जात आहे. त्यामुळे गाय केवळ प्राणी नव्हे तर परिवातील एखाद्या सदस्याप्रमाणे त्यांनी सांभाळले आहे, त्यामुळे गाय गरोदर असताना तिचेही घरातील महिला सदस्याप्रमाणे विधिवत डोहाळजेवण घालावे. त्यासाठी आपल्या नातलगांना आणि मित्र परिवाराला निमंत्रित करावे अशी कोल्हे परिवाराची इच्छा होती, म्हणूनच गाईचे डोहाळ जेवण कार्यक्रमाचे त्यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी गायीसाठी खास सजावट करून खास छप्पन भोग प्रसाद तिला देण्यात आला, यासोबत तिची खणा नारळाने ओटी भरून विधिवत पूजन करण्यात आले, तर उपस्थित महिलांसाठी ही खास पंचपकवान पदार्थ असलेल्या भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

हेही वाचा :

The post जळगावात गायीचे डोहाळे जेवण, छप्पन भोगाचा दाखविला प्रसाद appeared first on पुढारी.

Exit mobile version