
जळगाव : महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मंगळवारी सकाळी गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे दोन्ही बाजूंना मोटारींच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. दरम्यान, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदेंसह प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध केल्यानंतर शहरातील आकाशवाणी चौकातही ठाकरे गटातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलन सुरू होण्यापूर्वीच लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्यासह इतर आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन धांडे यांनी दिली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधासाठी बांभोरी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, तत्पूर्वीच प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे मोजक्या पदाधिकार्यांनी बांभोरी पूल गाठत आंदोलनाची तयारी केली. पुलावरच आंदोलकांनी झोपत महामार्ग रोखून धरला.
शिवसेना नेत्यांना अटक…
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी रमेश पाटील यांनी प्रशासन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. आंदोलनकर्त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी रमेश माणिक पाटील यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले.

आंदोलनात यांची होती उपस्थिती…
आंदोलनाचे नेतृत्व सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, उपमहापौर कुलभूषण पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी केले. आंदोलनात जिल्हा उपप्रमुख अॅड. शरद माळी, राजेंद्र ठाकरे, शहरप्रमुख धीरेंद्र पुरभे, भागवत चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते. शहरातील आकाशवाणी चौकातही ठाकरे गटातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात जात तेथे जोरदार घोषणाबाजी करीत राज्य व केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. तेथे प्रतिभा शिंदेंसह मुकुंद सपकाळे, अमोल कोल्हे आदींसह पदाधिकार्यांची उपस्थित होती.
हेही वाचा :
- नाशिक : ‘त्या’ नराधामाच्या घरातून द्रोण बनविण्याचे साहित्य जप्त
- ‘टारझन’ फेम हेमंत बिर्जे मराठी चित्रपटात दिसणार
- UAE Rover : ‘यूएई’चे रोव्हर चंद्राकडे रवाना
The post जळगावात चंद्रकांत पाटलांविरोधात रास्ता रोको appeared first on पुढारी.