जळगावात तीन पाटलांमध्ये जुंपली; गुलाबराव यांच्याविरोधात चिमणरावांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चिमणराव पाटील

नवी मुंबई; राजेंद्र पाटील : उत्तर महाराष्ट्रातील खान्देश हा राजकीय पटलावर सध्या चांगलाच गाजत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून त्यांच्याच पक्षातील म्हणजे शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांना मिळणारी सापत्निक वागणूक, मतदारसंघात हस्तक्षेप आणि मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागू नये, यासाठी केले जाणारे प्रयत्न यामुळे तीन पाटलांमधील वाद शिगेला पोहचला आहे. आमदार चिमणराव पाटील यांनी तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती पारोळा आणि पाचोरा मतदारसंघातील पदधिका-यांनी दिली.

शिवसेनेच्या चिन्हावर पारोळा मतदारसंघातून चिमणराव पाटील तर पाचोरा मतदारसंघातून किशोर आप्पा पाटील निवडून आले आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवली. या तीन मातब्बर आमदारांनी पारोळा, जळगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर पाचोरा मतदारसंघात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराचा पराभव करून विजयी झाले. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये चिमणराव पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार हे निश्चित झाले असताना गुलाबराव पाटील यांनी बाजी मारली. किशोर पाटील यांनीही मंत्री होण्यासाठी प्रयत्न केले होते.

शिवसेनेत फूट पडली आणि शिंदे गटाने ५० आमदारांसोबत भाजप बरोबर युती केली. यासाठी किशोर पाटील हे पहिल्या दिवसांपासून तर चिमणराव पाटील चार दिवसानंतर शिंदे गटात सामील झाले. गुलाबराव पाटील शिंदे यांच्यासोबत कायम राहीले. राजकीय पटलावरील वक्ता म्हणून गुलाबराव नेहमीच चर्चेत आहेत. याचा पुरेपुर फायदा घेत शिंदे गटात पहिल्या फळीतील खान्देश नेता म्हणून त्यांनी लेबल लावून घेतले. यामुळे जेष्ठ आमदार तसेच आयुष्यभर शिवसेनेत काढलेले चिमणराव पाटील मंत्री पदापासून दुस-यांदा दुर फेकले गेले. किशोर पाटील यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले. गुलाबराव यांनी मात्र खान्देशातील वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या आमदारांच्या मतदारसंघातील झेडपी, पंचायत समिती, बाजार समिती, ग्रामपंचायतील पदधिकारी फोडून आपली फळी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. पारोळा मतदारसंघातील झेडपी सदस्य डॉ.माने चिमणराव यांचे निकटवर्तीय समजले जात होते. त्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख केल्याने ते गुलाबराव यांच्या गटात सामील झाले आहेत.

मतदारसंघात होणारे हस्तक्षेप, निधी वाटप, मंजूर कामांना विलंब, जाणीवपूर्वक राजकीय काटा काढणे, मंत्रिमंडळ विस्तारात इतर कोणाला संधी मिळू नये यासाठी राजकीय डावपेच, असे प्रकार खान्देशात सुरू आहेत. यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात चिमणराव यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहीती मिळत आहे. तर किशोर यांनी मात्र सावध पवित्रा घेत या वादापासून चार हात लांबच राहणे पसंत केले आहे. याबाबत मतदारसंघातील काही पदधिकारी यांना विचारले असता हा वाद नवा नसून केवळ राजकारणातून एकमेकांना कसे संपवता येईल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी असा वाद शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि तत्कालीन भाजप मंत्री एकनाथ खडसे यांच्यात होता. त्यानंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील विरोधात जामनेरचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन असा रंगला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे विरोधात मंत्री गिरीश महाजन यांच्यात सुरू आहे. शिवसेना फुटीनंतरही दोन आमदार विरोधात एक मंत्री हा वाद सुरूच आहे.

हेही वाचा :

The post जळगावात तीन पाटलांमध्ये जुंपली; गुलाबराव यांच्याविरोधात चिमणरावांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार appeared first on पुढारी.