जळगावात पुन्हा खून ; चाकूने भोसकून युवकाची हत्या

जळगाव : जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून, खुनाचे सत्र सुरुच आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावल तालुक्यातील चितोडा येथे उधारीच्या वादातून तरुणाची झालेली हत्या ताजी असतानाच जळगावात पुन्हा खुनाची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटना लक्षात घेता गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक संपल्याची स्थिती निर्माण झाली आहे. जळगाव शहरातील एसएमआयटी महाविद्यालयाजवळ भावेश उत्तम पाटील (वय ३०, रा. आव्हाणे, ह.मु.निवृत्तीनगर, जळगाव) या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती सुत्रांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पाहणी केली. मयत तरुणाच्या अंगावर चाकूने वार केल्याच्या खूना असून, तरुणाचा मृतदेह रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. वाळू व्यवसायाच्या वादातून खून झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. खून केल्यानंतर संशयीत पसार झाले असून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करणे सुरू असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.

 

The post जळगावात पुन्हा खून ; चाकूने भोसकून युवकाची हत्या appeared first on पुढारी.