जळगावात स्कॉर्पिओतून गुरांची तस्करी, पाच गायींची सुटका

तस्करी

जळगाव; पुढारी ऑनलाईन : आजवर मोठ्या मालवाहू वाहनांद्वारे गुरांची तस्करी होण्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र, जळगावात स्कॉर्पिओ गाडीतून गुरे कोंबून त्यांच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरातून बेकायदेशीरपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनावर शहर पोलिसांनी कारवाई केली. या वाहनात कोंबण्यात आलेल्या ५ गायींची मुक्तता करण्यात आली.

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमी जवळून (एम.एच. ११ ए.के.६००९) या स्कॉर्पिओतून गुरांना कोंबून त्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर उन्हाळे, योगेश इंधाटे या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. याठिकाणी गुरांनी भरलेले वाहन सोडून चालक पसार झाला होता. पोलिसांनी हे वाहन शहर पोलीस ठाण्यात आणले. वाहन जप्त करण्यात आले असून, वाहनातील ५ गायींची मुक्तता करुन त्या गायींना पांझरापोळ येथील गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर उन्हाळे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post जळगावात स्कॉर्पिओतून गुरांची तस्करी, पाच गायींची सुटका appeared first on पुढारी.