जळगावी ७८ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांची ईकेवायसी जोडणी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत ऑगस्ट तसेच सप्टेंबरच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार पीएम किसान योजनेंतर्गत आतापर्यत जिल्ह्यात सुमारे ७८ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांची ईकेवायसी जोडणी झालेली आहे तर उर्वरीत शेतकऱ्यांनी देखील तातडीने जोडणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत वर्षातून तीन वेळा दोन हजार रूपये वार्षिक सहा हजार रूपये प्रमाणे डिबीटीव्दारे लाभ देण्यात येतो. जिल्ह्यात आठ अ-नुसार सहा लाख ४४ हजार ६४८ शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी सुमारे ४ लाख ७४ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केली आहे. आतापर्यत बहुंतांश शेतकऱ्यांना डिबीटी योजनेनुसार थेट त्यांच्या बँक खात्यात अकरा हप्यांचे वार्षिक सहा हजार रूपये प्रमाणे लाभ देण्यात आला आहे.

पीएम किसान योजनेंतर्गत मिळणाऱ्या सन्मान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना संबधीत  आधार व मोबाईल क्रमांकाची ईकेवायसी नुसार बँक खात्याशी जोडणी करणे आवश्यक आहे. नेटवर्कसह अन्य तांत्रिक अडचणीमुळे बहुतांश शेतकऱ्यांना जोडणी करणे शक्य नसल्यामुळे ईकेवायसी जोडणी करण्यासाठी आतापर्यत मार्च, मे तसेच ऑगस्ट २०२२ अशी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ७४ हजारांहून नोदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी ३ लाख ७० हजाराहून अधिक (७८ टक्के)शेतकऱ्यांची ईकेवायसी जोडणी पूर्ण झाली आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहू नये, यासाठी ईकेवायसी जोडणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांनी मोबाईल लिंकव्दारे, तलाठी मंडळ अधिकारी, कृषी विभाग तसेच आपले सरकार सीएससी केंद्रावर ऑनलाईनव्दारा रूपये १५ माफक शुल्काव्दारे ईकेवायसी जोडणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा:

The post जळगावी ७८ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांची ईकेवायसी जोडणी appeared first on पुढारी.