Site icon

जळगाव : अघोरी शक्तीची भीती घालून भोंदू बाबाने केली ११ लाखांची फसवणूक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा :  आज 21 व्या शतकात वावरतानाही समाजमनातील अंधश्रद्धा कायम आहे. याचाच गैरफायदा घेत काही कुप्रवृत्ती सर्वसामान्यांच्या धार्मिक भावनांशी खेळ करत आहेत. जळगावात असाच एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. आपल्या अंगात दैवी शक्ती आहे. तुमच्या घरात भूतबाधा व आत्म्याचा वास असून, असलेली भुताटकी दूर करण्यासाठी जळगावातील एका दाम्पत्याला भोंदूबाबाने तब्बल ११ लाखात लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, घरात सुखशांती नांदावी, घरातील व्यक्तीने केलेल्या आत्महत्येमुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळवून देण्यासाठी होमहवन यासह इतर कारणं व अघोरी शक्तीची भीती घालून जळगाव शहरातील दाम्पत्याला ललीत हिमंतराव पाटील व त्याची पत्नी महिमा उर्फ मनोरमा पाटील (रा. पिंप्राळा) या भोंदू दाम्पत्याने तब्बल ११ लाख ३२ हजार रुपयांना लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे भोंदू बाबाचे पितळ उघडे पडले आहे. या भोंदू दाम्पत्याविरुध्द रामानंद नगर पोलिसात फसवणूक, महाराष्ट्र नरबळी, जादूटोणा, इतर अमानुष व अघोरी प्रथाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसात गेल्यास सात पिढ्यांचा नाश…

जळगाव येथे राहणारे दांपत्य कोरोना काळात तणावात होते. या दाम्पत्याच्या पत्नीला तिची कॉलेजची मैत्रीण मोहिनी हिने माझ्या घरी ये. माझे पती यावर काहीतरी उपाय करतील असे सांगितले. सावखेडा शिवार येथील मेरा घर अपार्टमेंटमध्ये गेल्यावर ललित पाटील यांनी सांगितले की, नुकताच मृत झालेल्या दिराचा आत्मा तूझ्या अंगात घुसला आहे. त्या आत्म्याचे घरावर प्रेम असल्याने त्याची शांती केल्याशिवाय घरातील ही बाधा दूर होणे अशक्य आहे. ओळखीचा फायदा घेत महिमा पाटील हिने आपल्या पती ललित अघोरी पुजा करतो. त्याच्या अंगात अजमेरचा पीर येतो. असे सांगत विश्वास संपादन केला. पूजा विधीसाठी या दाम्पत्याकडून ११ लाख ३२ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने व रोख असे घेतले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित दाम्पत्य पोलिसात गेल्यास मी अघोरी शक्तीने तुमच्या सात पिढ्यांचा नाश करेन. पैसे परत मागू नका अशी धमकी भोंदू बाबाने दिली.


अधिक वाचा :

The post जळगाव : अघोरी शक्तीची भीती घालून भोंदू बाबाने केली ११ लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Exit mobile version