जळगाव : अत्याचार पीडित महिलेनं दिला बाळाला जन्म; बदनामीच्या भितीने अर्भकाला फेकले नाल्यात

मृत अर्भक,www.pudhari.news

जळगाव : चोपडा तालुक्यातील एका गावात ३६ वर्षीय महिलेवर नराधमाने दारुच्या नशेत अत्याचार केला होता. या प्रकारातून पीडीत महिला गर्भवती राहिल्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. मात्र, बदनामीच्या भितीने नवजात अर्भकाला बेवारस अवस्थेत सोडून दिले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणी तपास करुन मातेचा शोध लावला व पीडीतेच्या तक्रारीनंतर आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पीडित महिलेनं चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरुन संशयित आरोपी कैलास गोकुळ पाटील याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. चोपडा तालुक्यातील एका गावात ३६ वर्षीय पीडित महिला मजुरी काम करून उदरनिर्वाह करते. नऊ महिन्यापुर्वी संशयीत आरोपी कैलास गोकूळ पाटील याने दारूच्या नशेत पीडित महिलेच्या झोपडीत जाऊन अत्याचार केला होता. त्यातून महिला गर्भवती राहिल्यानंतर तिने नुकताच पुरूष जातीच्या नवजात बालकाला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्यानंतर ही बाब समाजात कळाल्यानंतर बदनामी होईल, म्हणून पीडीतेने नवजात बालकाला नाल्यात टाकले. गावातील नाल्यात अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांची रुग्णालयात धाव…
याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्याने पोलिसांनी धाव घेत बालकावर तातडीने उपचार केले. यावेळी रुग्णालयात तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे आदींनी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी या बालकाच्या मातेचा शोध घेतला. या पीडितेची चौकशी केली असता, तिनं अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली. यानंतर मंगळवारी (दि. ९) रात्री आरोपी कैलास पाटील विरोधात तक्रार दिल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post जळगाव : अत्याचार पीडित महिलेनं दिला बाळाला जन्म; बदनामीच्या भितीने अर्भकाला फेकले नाल्यात appeared first on पुढारी.