Site icon

जळगाव : ‘आम्‍ही पवारांना घाबरतो; त्‍यांच्यासारखी बुद्धी कोणाचीही चालत नाही’

जळगाव : पुढारी वृत्‍तसेवा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्री गुलाबराव पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात खटके उडाल्याचे पहायला मिळाले होते. यानंतर गुलाबराव पाटील यांनी पुन्हा अजित पवारांवर टीका केली आहे. पवारांसारखी कोणाचीही बुद्धी चालत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना घाबरून असतो, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार आणि अजित पवारांना टोला लगावला.

गुलाबराव पाटील आपल्या रांगड्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. ते कधी कोणाची टोपी उडवतील याचा नेम नसतो. त्याचाच प्रत्यय जळगावमधल्या विवाह सोहळ्यात आला. वधूचे घरचे आडनाव पवार होते. हाच धागा गुलाबराव पाटलांनी हेरला. ते म्हणाले, पवारांसारखी कोणाचीही बुद्धी चालत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना घाबरून असतो. ते सकाळी-सकाळी कधी शपथ घेतील आणि काय करून टाकतील याचा नेम नसतो. त्यांच्या बुद्धीपुढे कोणाचेही चालत नाही. त्यामुळे त्यांना नेहमी सोबत ठेवतो, असा चिमटा त्यांनी काढला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

५० खोके-नागालँड ओके…

राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये एनडीपीपी आणि भाजप सरकारला पाठिंबा दिला. यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुलाबराव पाटील यांनी ५० खोके, नागालँड ओक्के… अशी घोषणाबाजी केली होती. या देशात आणि राज्यात बदलाचे वारे वाहायला लागल्याची वक्तव्ये मी वर्तमानपत्र आणि टीव्हीवर ऐकली. नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याचंही मी पाहिलं. मलासुद्धा असं वाटतं की, नागालँडमध्ये ५० खोके-सबकुछ ओक्के झालंय का? अशी शंका निर्माण झालेली आहे. एकीकडे जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे, तिकडे जाऊन मांडीला मांडी लावून बसायचं, हे राष्ट्रवादीलाच जमत. पण खरंच नागालँडमध्ये ५० खोके, सबकुछ ओक्के असं झालंय का? असा सवाल करत गुलाबरावांनी डिवचल्यानंतर अजित पवारांच्या संतापाचा पारा चढल्याचे पहायला मिळाले होते.

हेही वाचा :  

The post जळगाव : 'आम्‍ही पवारांना घाबरतो; त्‍यांच्यासारखी बुद्धी कोणाचीही चालत नाही' appeared first on पुढारी.

Exit mobile version